अभिनेते जितेंद्र जोशी सुसंवादकाच्या भूमिकेत

लोकसत्ता तरुण तेजांकित उपक्रमाच्या शनिवारी होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहोळ्याला ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर आणि फ्यूजन संगीतकार म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेले त्यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर यांच्या सुरांची साथ मिळणार आहे. तर अभिनेता जितेंद्र जोशी या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे.

मध्य प्रदेश शासनाच्या प्रतिष्ठेच्या तानसेन पुरस्कारासह केंद्र शासनाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही पं. पोहनकर यांना मिळाला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांच्या सूरांची तसेच फ्यजून संगीतकार, कीबोर्डवरील शास्त्रीय संगीताचे वादक अशी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख असलेले पं. पोहनकर यांचे सुपुत्र अभिजित यांच्या फ्यूजन संगीताची अनुभूती उपस्थित श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. त्यांच्यासह राजस्थानातील लोकसंगीतकारांचा ताफाही कला सादर करणार आहे.

अभिनेते जितेंद्र जोशी यांनी विविध मराठी चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली असून अनेक पुरस्कार वितरण सोहळे आणि कार्यक्रमांचे खुमासदार सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन ते करणार आहेत.

विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाच्या गुढय़ा उभारणाऱ्या तरुणांचा आदर्श समाजापुढे यावा यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. भारतातच नव्हे, तर अमेरिका, स्वीडन, जर्मनी, चीन अशा देशांतही आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योगसंस्कृतीची पताका फडकावीत असलेले ‘भारत फोर्ज’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी आणि सनदी लेखापाल, सारस्वत बँकेचे अध्यक्ष ते केंद्रातील विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री असा अनुभव असलेले सुसंस्कृत मंत्री सुरेश प्रभू हे या सोहोळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रांतील निमंत्रित मान्यवरांच्या खास उपस्थितीत वेगवेगळ्या क्षेत्रांतील बारा  तरुणांना  तरुण तेजांकित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शनिवार, ३१ मार्च रोजी मुंबईत होणारा हा गौरव सोहळा नंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. ‘प्राइसवॉटरहाऊसकुपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीकडून या तरुणांची निवड करण्यात आली. ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गणेशोत्सवात ‘सर्व कार्येषु सर्वदा’ हा दानयज्ञ आयोजित केला जातो. विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला झोकून घेऊन उत्तम कामाची उभारणी करीत असलेल्या संस्थांना मदतीचा हात द्यावा, हा त्यामागील उद्देश. ‘तरुण तेजांकित’ हा त्याच उद्देशाच्या वाटेवरील पुढील पाऊल आहे.

कार्यक्रमाचे टायटल पार्टनर ‘केसरी टूर्स’ असून ‘मिराडोर’ आणि ‘सारस्वत बँक’ हे असोसिएट पार्टनर आहेत. पॉवर्ड बाय एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड, एम. के. घारे ज्वेलर्स, अनुरूप विवाह संस्था आणि न्युट्रीव्हॅल्यू असून हेल्थपार्टनर ‘आयुशक्ती’ आहेत. ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ हे हिलिंग पार्टनर, ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ हे नॉलेज पार्टनर, ‘एबीपी माझा’ हे टेलिव्हिजन पार्टनर आणि ‘फिव्हर १०४ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत.