भविष्याचा वेध घेत भवतालात बदल घडवून आणण्याची ईष्र्या बाळगणारे आणि त्यानुरूप काम करणारे युवाजन आपल्या आजूबाजूला मोठय़ा संख्येने दिसतात, वावरतात. त्यांचा उचित गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्याबरोबर या गुणी प्रज्ञावंतांप्रमाणेच मानदंड निर्माण करण्याची प्रेरणा त्यांच्यासारख्या इतरांना देणे या भावनेतून ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षी ‘तरुण तेजांकित’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला भरभरून प्रतिसाद मिळाला. या वर्षीही हा उपक्रम राबवत असताना, पहिल्या वर्षी ‘तरुण तेजांकित’ ठरलेल्यांची पुनर्भेट समयोचित ठरेल.

गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’ने १२ युवारत्नांना गौरवले. कला, क्रीडा, समाजसेवा, आरोग्य, संशोधन अशा विविध क्षेत्रांतील कार्याला मिळालेली ती पावती होती. ग्रामीण भागातील अंध, अपंग आणि गरीब विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी सिद्ध करणारे यजुवेंद्र महाजन, अनाथाश्रमातील मुलांचे भविष्य सुनिश्चित करणारे सागर रेड्डी, गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी संस्था जाळे उभे केलेले शंतनू पाठक, फॅशनला देशी आणि सांस्कृतिक आकृतिबंद देणाऱ्या फॅशन डिझायनर वैशाली शडांगुळे असे वेगळ्या वाटा धांडोळणारे प्रवासी गेल्या वर्षी ‘तरुण तेजांकित’च्या माध्यमातून प्रकाशात आले.

दुष्काळी गावात शेतकरी घरात जन्म किंवा दुर्गम आदिवासी पाडय़ात बालपण, शाळेसारख्या मूलभूत बाबीसाठी करावी लागलेली मैलमैल करावी लागलेली धावपळ अशा प्रतिकूल बाबींना संकटापेक्षा आव्हान मानून नावारूपाला आलेल्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये चमकलेल्या धावपटू ललिता बाबर आणि कविता राऊत याही गेल्या वर्षी मानकरी ठरल्या होत्या. रंगभूमी, चित्रपट आणि डिजिटल माध्यमांतील प्रयोगशीलतेबद्दल आणि अभिनयसौष्ठवाबद्दल निपुण धर्माधिकारी, मुक्ता बर्वे, राहुल भंडारे यांचा गौरव झाला होता. तर आहारशास्त्र, अभियांत्रिकी आणि ऊर्जा अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील अनुक्रमे अम्रिता हाजरा, जव्वाद पटेल आणि सौरभ पाटणकर यांच्या संशोधनकार्याची दखल ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’मध्ये घेण्यात आली.

वयाची चाळिशीही न ओलांडलेले हे प्रज्ञावंत आगामी ‘तरुण तेजांकितां’साठी निश्चितच प्रेरणास्थान ठरावेत, असे आहेत. अशा प्रज्ञावंतांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तरुण तेजांकित वेबसाइट हे या प्रक्रियेतले पहिले पाऊल आहे. या वेबसाइटवर जाऊन, माहिती घेऊन आपल्या कार्याचा पट उत्सुक तरुणांना सादर करता येईल. निवडीसाठी लवकरच विभागीय मार्गदर्शन समित्याही स्थापन होत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून स्वत:ची किंवा आपल्या आजूबाजूच्या गुणी युवांची माहिती सादर करता येईल. तसेच वेबसाइटवर इतरांची नावेही सुचवता येतील.