‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळयात मान्यवरांचे गौरवोद्गार

‘‘विज्ञान असो किंवा संगीत, स्वतंत्र प्रतिभा निर्माण करण्यासाठी ठरावीक कालावधीत घेतलेल्या पदवीपलीकडे तपश्चर्या करावी लागते. तोपर्यंत मिळालेले ज्ञान हे फक्त गुरूची आठवण ठरते. स्वतंत्र प्रतिभा निर्माण करण्याची क्षमता आजच्या तरुणांमध्ये नक्कीच आहे. प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम काम करणारे तरुण हे याचेच द्योतक आहेत,’’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ संशोधक, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सन्मान सोहळ्यात शनिवारी काढले.

भविष्यालाही अभिमान वाटेल अशा वर्तमानाचा गौरव ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सन्मान सोहळ्यात करण्यात आला. डॉ. अनिल काकोडकर आणि पं. उल्हास कशाळकर यांच्या उपस्थितीत हा कौतुक सोहळा रंगला. विज्ञान आणि कलेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा संगम साधलेल्या या सोहळ्यात प्रसिद्ध कवी स्वानंद किरकिरे यांनी डॉ. काकोडकर आणि पं. कशाळकर यांच्याशी संवाद साधला.

तरुणाईच्या कामगिरीला दाद देऊन डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘ही पिढी उत्तम काम करीत आहे. हे तरुण प्रतिकूल परिस्थितीत खूप चांगले काम करत आहेत. काम न करू शकणारे तरुण जेव्हा दिसतात, तेव्हा त्यांना दोष देणे योग्य नाही. हा पूर्ण शिक्षण व्यवस्थेचाच प्रश्न आहे. आता टोकाची स्पर्धा, वेग अशा परिस्थितीत तरुणांना वाटचाल करावी लागते. त्यातही ते करत असलेले काम हे नक्कीच आशादायक आहे.’’ विज्ञान किंवा एखाद्या वैज्ञानिक घटनेवर आधारित चित्रपटांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘ऐतिहासिक किंवा विशिष्ट घटनेवर बेतलेली कलाकृती असेल तर ती साकारताना सत्याशी फारकत घेऊ नये. घटनेचा संदर्भ घेऊन काल्पनिक कथानकावर कलाकृती साकारली असल्यास त्याची स्पष्ट पूर्वकल्पना प्रेक्षकांना द्यावी.’’

गुरू-शिष्य परंपरेचे कालातीत महत्त्व पं. कशाळकर यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘संगीत शिक्षण हे पदवी स्वरूपातही मिळते. काही चौकटी सांभाळण्यासाठी ते योग्यही आहे. मात्र संगीत ही ठरावीक साच्यात शिकता येणारी विद्या नाही. त्यासाठी साधना आवश्यक असते, गुरू आवश्यक असतो.’’ जिद्दीने काही करू पाहणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक करताना पंडितजी म्हणाले, ‘‘भविष्यात हाती नेमके काय लागेल हे माहीत नसतानाही तरुण पिढी कष्ट घेते, आयुष्य पणाला लावते. सक्षम कलाकार घडत आहेत. श्रोत्यांना खेचण्याची, खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. मात्र त्याचवेळी श्रोत्यांवर चांगल्या संगीताचे संस्कार व्हायला हवेत.’’

‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ  पाटील व शैलेश पाटील, ‘सारस्वत बँक’चे गौतम ठाकूर, ‘रुणवाल ग्रुप’चे संदीप रुणवाल, ‘सिडको’च्या प्रिया रातांबे, एम. के. घारे ज्वेलर्सचे उदय घारे, ‘लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे रवींद्र सुळे, ‘पीडब्ल्यूसी’चे सुभाष पाटील, ‘एमआयडीसी’चे पी. अनबलगन, ‘परांजपे स्कीम’चे अमित परांजपे तेजांकितांच्या कामाला दाद देण्यासाठी उपस्थित होते.

ल्ल या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, सरकारी आस्थापनांचा कार्यक्रमात सहभाग असल्याने आचारसंहितेच्या कारणास्तव हे दोन्ही नेते उपस्थित राहू शकले नाहीत.

या उपक्रमाचे टायटल पार्टनर ‘केसरी टूर्स’असून ‘सारस्वत बँक’, ‘रुणवाल ग्रुप’ आणि ‘सिडको’ हे असोसिएट पार्टनर होते. पॉवर्ड बाय पार्टनर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ आणि ‘लाईफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ हे होते. ‘पीडब्ल्यूसी’ हे या कार्यक्रमाचे नॉलेज पार्टनर असून ‘एमआयडीसी’ हे इव्हेंट पार्टनर, ‘परांजपे स्कीम’ हे रिअ‍ॅल्टी पार्टनर तर ‘एबीपी माझा’ टेलिव्हिजन पार्टनर होते.

विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती दीर्घ प्रक्रियेचा भाग!

विज्ञान किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील यशाचा टप्पा दीर्घकालीन प्रक्रियेचा परिपाक असतो. तत्कालीन नेतृत्व त्यावेळी पुढे आले तरी शोधामागील प्रक्रिया फार पूर्वीपासून घडत असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे मत ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.