सुरेश प्रभू आणि बाबा कल्याणी प्रमुख पाहुणे

विज्ञान-तंत्रज्ञानापासून उद्योग, क्रीडा, समाजसेवा, राजकारण आणि कलेपर्यंतच्या क्षेत्रात तरुण वयातच आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमटवीत असलेल्या युवाशक्तीचा आज, शनिवारी मुंबईत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमात गौरव होणार आहे. या दिमाखदार सोहळ्यात या युवाशक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि उद्योगपती बाबा कल्याणी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या विजेत्यांची ऐन वेळी व्यासपीठावरूनच घोषणा होणार असून त्यामुळेच हे ‘तरुण तेजांकित’ कोण, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर तसेच फ्यूजन संगीतकार आणि कीबोर्डवर शास्त्रीय संगीताचे वादक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेले त्यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर या पिता-पुत्रांची स्वरसाथ हे या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. अभिनेते जितेंद्र जोशी या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. ‘लोकसत्ता’च्या http://www.facebook.com/LoksattaLive/ या फेसबुक पेजवरून कार्यक्रमाचे थेट प्रसारण संध्याकाळी सव्वासहा वाजल्यापासून पाहता येणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी तरुणाई आणि तिची सकारात्मक ऊर्जा समाजापुढे ठळकपणे आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमाचे यंदा पहिले वर्ष असून समाजातील तरुणांच्या या सकारात्मक ऊर्जेला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

देशभरातून आलेल्या स्वनामांकन पत्रांतून ४८ जणांची निवड करण्याचे काम ‘प्राइसवॉटरहाऊस कुपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीने केले. त्यानंतर पाच तज्ज्ञांच्या निवड समितीने अंतिम १२ जणांची निवड या पुरस्कारासाठी केली. ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, ‘एलआयटी फायनान्स होल्डिंग’चे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या निवड समितीत सहभाग होता.

कार्यक्रमाचे टायटल पार्टनर

‘केसरी टूर्स’ असून ‘मिराडोर’ आणि ‘सारस्वत बँक’ असोसिएट पार्टनर आहेत. पॉवर्ड बाय एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि., एम. के. घारे ज्वेलर्स, अनुरूप विवाह संस्था आणि न्युट्रीव्हॅल्यू तर हेल्थपार्टनर ‘आयुशक्ती’ आहेत. ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ हे हीलिंग पार्टनर, ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ नॉलेज पार्टनर, ‘एबीपी माझा’ हे टेलिव्हिजन पार्टनर आणि ‘फिव्हर १०४ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत.