सतत धावत्या असणाऱ्या आपल्या सभोवतालच्या जगात गतवर्षांत अनेक घडामोडी, घटना घडून गेल्या़  विविध माध्यमांतून त्यातील ठळक त्या आपल्यापर्यंत पोहोचल्याही असतील़  परंतु काळाच्या ओघात त्यांचे विस्मरणही झाले असेल़  कारण वर्षभरातील स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे स्मरण ठेवणे जितके कठीण तितकेच त्यांच्या दैनंदिन नोंदी केलेल्या असणेही!
परंतु, अशा नोंदी केलेली वही कोणी आयती आपल्या हातात दिली तर? लेखक, पत्रकार, विश्लेषक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षांचीही तयारी करणारे उमेदवार किंवा अगदी गतवर्षांबद्दल संकलित माहिती हवी असणारे कोणालाही किती – किती उपयुक्त होईल, नाही का? हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘लोकसत्ता’ने या वर्षी पहिल्यांदाच मराठीतील पहिलावहिला ‘वर्षवेध’ तयार केला आह़े
गतवर्षांत जगभरातील अनेक देशांच्या राज्यघटना बदलल्या, राजकीय सत्तांतरे झाली, भीषण स्फोटांच्या मालिकांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागल़े  धर्मगुरू बदलले, धर्मस्थळांच्या भूमिका बदलल्या, धार्मिक तणावाचे प्रसंगही उद्भवल़े  
राजकारण आणि क्रीडा क्षेत्रांत अनेकांचा उदयास्त झाला़  गतवर्षांतील या आणि अशा अनेक घडामोडींच्या दैनंदिन नोंदी आणि इतरही काही आवश्यक माहितीचा ‘वेध’ या अंकात घेण्यात आला आह़े
गेल्या वर्षांतील राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय ठळक घटनांचा ‘वेध’ घेणारा ‘वर्षवेध २०१३’ १७ जानेवारीपासून सर्वत्र उपलब्ध होणार आह़े

विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यापर्यंत सगळय़ांसाठी..
गतवर्षीच्या घडामोडींना उजाळा देणारा हा वार्षिक अंक खरे तर सर्वासाठीच उपयुक्त माहितीचा स्रोत आहे. मात्र त्यातही शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांतील उमेदवार, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, सामान्यज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्यासाठी हा अंक म्हणजे २०१३ मधील प्रमुख घडामोडींचा संग्रह ठरणार आहे.

ठळक वैशिष्टय़े
*  गेल्या वर्षांतील घडामोडींच्या तारीखनिहाय नोंदी
*  २०११च्या जनगणनेतील उपयुक्त आकडेवारी
*  महत्त्वाची सांख्यिकी माहिती
* ‘लोकसत्ता’मध्ये संबंधित निवडक विषयांवर आलेल्या लेखांच्या वेबलिंक