कला वक्तृत्वाची; प्रा. डॉ. राम कुलकर्णी

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

आपला आवाज कसा आहे हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी माईक अथवा लाऊडस्पीकर उपलब्ध नव्हते. त्यामुळे मोठय़ा जनसमुदायासमोर भाषण करायचे असेल तर मोठय़ा आवाजात सर्वाना ऐकू जाईल असे बोलणे क्रमप्राप्त होते. अशा प्रकारचा मोठा आवाज कमविण्यासाठी निश्चित मेहनत घ्यावी लागेल. आज लाऊडस्पीकरचा शोध लागला असला तरी त्यावर कसे बोलावे, आपला आवाज सर्वसामान्य लोकांना कसा आवडेल आणि सुसह्य़ वाटेल हे पाहणे प्रत्येक वक्त्याचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपला आवाज कसा आहे याचा अभ्यास करून आपला स्वत:चा आवाज आपण ऐकला पाहिजे.

स्वत:चा आवाज ऐकायचा असेल तर तो ध्वनिमुद्रित करून ऐकला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या आवाजाची नीट कल्पना येऊ शकेल. ध्वनिमुद्रित भाषण ऐकताना आपण शब्दांवर योग्य तो भर देत आहोत की नाही तसेच आपण बोलत असलेल्या शब्दांचे उच्चार शुद्ध आहेत किंवा नाही ते पाहिले पाहिजे. काही वेळा आपले शब्द हेल काढल्याप्रमाणे वाटतात किंवा आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील बोली भाषेप्रमाणे आपले हेल येणे शक्य असते. उदा- वक्ता जरी मराठी भाषेत बोलत असला तरी पुणेरी मराठी भाषा वेगळी आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातही मराठी भाषेत असणारे हेल वेगळे आहेत. खानदेशातील माणूस एका वेगळ्याच प्रकारे मराठी बोलतो. कोकणातील मराठी भाषा वेगळी आहे.

chart

विदर्भातील व्यक्ती वेगळ्याच शैलीत मराठी बोलतात, तर मराठवाडय़ातील व्यक्तींची मराठी बोलण्याची पद्धत आणखीन भिन्न आहे. भाषा जरी एक असली तरी विभिन्न प्रांतातील व प्रदेशातील लोक तीच भाषा वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळे हेल काढून बोलतात असे दिसून येते. ज्याला चांगला वक्ता व्हायचे आहे त्याने शक्यतो आपल्या भाषणात आपले प्रादेशिक हेल येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला स्वच्छ, प्राज्ञ, शुद्ध अशी भाषा बोलता आली पाहिजे. आपल्या भाषणातील सर्व उच्चार शुद्ध,  सात्त्विक व ठाशीव आले पाहिजेत. खरे तर ज्या प्रदेशात आपले भाषण असेल तेथील पद्धतीनुसारच आपण बोलायला पाहिजे.

आपला आवाज श्रोत्यांना सुसह्य़ व्हावा व श्रोत्यांना आनंदी, उल्हसित करणारा हवा. त्यासाठी वक्त्याने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत. आवाजाचे योग्य ते व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे व्यायाम करता येतील.

आपला जबडा पूर्णपणे उघडून व मोठा करून जांभई दिल्यासारखी हालचाल करावी आणि तोंडातून जांभई देताना येतो तसा आवाज काढावा. यामुळे आपल्या जबडय़ाचे स्नायू मोकळे व सैल होतात व घशातून येणारा आवाज अधिक चांगला व श्रोत्यांना सुसह्य़ होऊ शकतो.

दीर्घ श्वास घेऊन हळूहळू नाकाने हवा फुप्फुसात घ्यावी. फुप्फुसात हवा भरून घेतल्यानंतर काही सेकंद थांबून तोंडाने जांभई द्यावी. असे सात ते आठ वेळा करावे. यामुळे आवाजाचे सूर खुलण्यास व मोकळे होण्यास मदत होते.

रोज पंधरा ते वीस मिनिटे भगवद्गीतेचा एखादा अध्याय, गणपतीअथर्वशीर्ष किंवा एखादे संस्कृत स्तोत्र/श्लोक स्पष्ट आवाजात म्हणण्याचा सराव ठेवावा. बोलताना माईकपासून योग्य अंतरावर उभे राहिले पाहिजे. ज्यांचा आवाज मुळातच मोठा आहे त्यांनी माईकपासून थोडे दूर उभे राहून बोलावे. जे माईकच्या खूप जवळ उभे राहून भाषण करतात त्यांचे शब्द श्रोत्यांना नीट समजत नाहीत. शब्द फाटतात व आवाज घुमल्यासारखा वाटतो. काही जण माईकच्या आजूबाजूला जाऊन किंवा अन्य ठिकाणी तोंड फिरवून बोलतात. त्यामुळेही ते शब्द श्रोत्यांच्या कानावर पडत नाहीत.

( ‘सभा जिंकणारी प्रभावी भाषणे कशी कराल’ या  डॉ. राम कुलकर्णी यांनी लिहिलेल्या  ‘सानिका’ प्रकाशनाच्या पुस्तकावरून साभार..)