१२ डिसेंबर १९३८ रोजी मुंबईत झालेल्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणातील काही भाग.

कला वक्तृत्वाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
Muslim Students Learning Sanskrit Video:
हिंदू मंदिरात पुजारी होण्यासाठी मुस्लिम विद्यार्थी घेतायत संस्कृतचे धडे? Video तुन सावधानतेचा इशारा पण? खरं..

मुंबईमध्ये तुम्ही अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आणि ते सर्व परीने यशस्वी झाले आहे. अशा प्रकारची संमेलने फार होतात. त्या प्रसंगी कोणी अध्यक्ष आला की मी नेहमी पाहतो. त्याने भाषण केले की त्यात विद्यार्थ्यांना टोमणा मारलेला असतो. तुम्ही शिकून काय करणार? सरकारी नोकरी? त्यांना देशसेवा करण्याचाही उपदेश करण्यात येतो पण यात काही हशील नाही. विद्यार्थ्यांसंबंधी मी जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे सांगू इच्छितो की, हा उपदेश खोटा आहे आणि मी तसाच उपदेश करणार नाही.

शिक्षण पूर्ण झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो. मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविक आहे. परंतु शिकलेला मनुष्य स्वत:चे हित पाहतो, समाजाचे पाहात नाही. तो आपल्या बायका-पोरांची व स्वत:च्याच हिताची काळजी घेतो. मॅझिनी म्हणतो, ‘लोकात पारतंत्र्य पसरले. माणसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्काची जाणीव जास्त उत्पन्न होते’. आपले कर्तव्य कोणते याची भावना जागृत होत नाही हा एक शिकलेल्या माणसांचा दोष आहे. मला खेद वाटतो की शिकलेल्या मनुष्यास पदवी मिळाली आणि त्याला नोकरी लागली की त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ खुंटतो. विद्येचे महत्त्व खुंटले जाते. मी प्रवास करत असता मजजवळ नेहमी चार पुस्तके, वर्तमानपत्रे असतात. परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके व वर्तमानपत्रे यांच्याऐवजी सिगरेटच्या पेटय़ा मात्र दिसतात.

मी तरी पाहतो तुम्हा शिकलेल्या मुलांत सौंदर्याची गोडी दिसते. लग्नात मुलगी सुंदर आहे काय? ती आपणास पसंत आहे काय? वगैरे गोष्टी पाहता. पण तोच हक्क मुलींना द्या, बऱ्याच सुंदर स्त्रिया कुरूप माणसाच्या स्वाधीन झालेल्या मी पाहिल्या आहेत. या देशाचा मला कंटाळा आलेला आहे. परंतु मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे म्हणून मला येथे राहणे भाग पडले. यातील धर्म, सामाजिक रचना, सुधारणा व संस्कृती यांचा मला फार कंटाळा आलेला आहे. i am at war with civilization.

येथील कोटय़धीश मारवाडय़ाच्या घरात काय दिसेल? त्यांच्या घरात स्टॅच्यू, फर्निचर, पेंटिंग, व पुस्तके यापैकी एकही वस्तू दिसणार नाही. हीच गोष्ट ब्राह्मणाची. एखाद्या ब्राह्मण कारकुनास पगार झाल्यावर तो आपल्या बायकोस एखादी सोन्याची पुतळी करण्याच्या गडबडीत असतो. कारण सोने संकटसमयी उपयोगी पडते ना! जगात फक्त जगणे हेच जर ध्येय असेल तर पशू आणि माणूस यात फरक काय? मनुष्य सौंदर्याची साठवण करू शकतो पशूला ते करता येत नाही. नुसती कॉलर ताठ करून आणि नेकटाय बांधून सौंदर्य वाढत नाही.

आत्तापर्यंत दहा-अकरा वेळा विलायतेला गेलो. माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेस आले होते. त्यांना आता मी पाहतो तो काय त्यांना वर्णाश्रम धर्म मान्य! त्यांच्यावर काही एक परिणाम झालेला आढळत नाही. कारण त्यांचा जन्म हिंदू. हिंदू धर्मातील सर्व घाण त्यांना मान्य. तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात. अत्यंत घाणेरडय़ा पाण्यात अत्तराचा थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे. तुमच्या आईबापांना शिक्षण नाही. अठराविश्वे दारिद्रय़ तेव्हा हा मैला साफ करणे हे तुमचे कर्तव्य आहे. बायबलात मी वाचले आहे की मीठच जर अळणी झाले तर बाकी पदार्थाना कशी चव येणार?

कोणतेही कार्य करण्याकरिता आपल्या अंगचे गुण स्थिरावले पाहिजेत आणि ते स्थिरावण्याकरता निदान एक पिढी तरी लोटली पाहिजे. स्वत: सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकविणार? सुधारणेचे मूळ वंशपरंपरागत रुतले गेले पाहिजे. तुमच्यात या गुणांचा जर अभाव असेल तर आटोकाट प्रयत्नाने ते मिळवा.

विद्येचा व्यासंग महत्त्वाचा..

मनुष्य बी.ए. झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय? बी.ए. किंवा एम.ए. म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले, ही भावना चुकीची आहे. अगस्ती मुनींनी ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटते. विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे. ज्याप्रमाणे माणूस एकदा दारू प्यावयास लागल्यावर तो ती जन्मभर पीत राहतो त्याप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे.

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’

(अनुबंध प्रकाशन प्रकाशित वक्तृत्व कला दिग्गजांची’ –श्यामसुंदर उके या पुस्तकावरून साभार)