तरुणाईला विचारप्रवृत्त करणाऱ्या, सभोवतालच्या घटनांवर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या यंदाच्या पर्वातही राजकीय, सामाजिक, पर्यावरण, क्रीडा आदी विषयांवर सशक्तपणे  व्यक्त होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. स्पर्धेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.

ओघवत्या शैलीतील भाषणांनी जनमानसावर गारूड करणाऱ्या वक्त्यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या वक्त्यांच्या भाषणांनी सामाजिक जडणघडणीची बीजे रोवली. कालौघात ही कला हरवत असल्याची व्यक्त करण्यात येणारी भीती गेल्या पाच वर्षांत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’या स्पर्धेने फोल ठरवली आहे. तरूणाईला गांभीर्य नाही, विचारधारा नाही, मते नाहीत असे गैरसमज मोडीत काढत महाविद्यालयीन तरूणाई या व्यासपीठावर निर्भिडपणे व्यक्त झाली. वक्तृत्व कलेची परंपरा समर्थपणे पुढे नेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष आहे.

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ ही स्पर्धा २६ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान रंगणार आहे. राज्यभरातील शहरांपासून खेडय़ांपर्यंत पसरलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या मंचावर व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’असून स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोबिंवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत.

विषय कोणते?

१ ‘निर्भया आणि नंतर’

२ ‘जंगलाच्या शोधात वाघोबा!’

३  ‘स्वच्छ भारत : एक दिवास्वप्न’

४ ‘ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर’

५ ‘ऑलिम्पिक वर्षांत क्रिकेटची चिंता’

स्पर्धेचे स्वरूप : राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेले कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ही स्पर्धा तीन टप्प्यांत होणार आहे. प्राथमिक फेरीतून निवडलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. विभागीय अंतिम फेरीतील विजेत्या वक्त्यांची महाअंतिम फेरी मुंबईत रंगेल आणि त्यातून या वर्षीचा राज्यातील ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ कोण हे ठरेल.