19 April 2019

News Flash

इंधन अद्याप जीएसटीच्या कक्षेत का नाही?

इंधनाची दरवाढ झाली की लगेच अनेक जीवनावश्यक वस्तू आणि सेवा महागतात आणि सामान्यांच्या मासिक खर्चाचे गणित चुकते.

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये जाणून घेण्याची संधी

वस्तू व सेवा कराच्या कक्षेत इंधन आले, तर त्याचे दरांवर काय परिणाम होतील? अद्याप पेट्रोल-डिझेलला हा कर का लागू करण्यात आला नाही? या प्रक्रियेतील अडथळे काय? सातत्याने वाढणाऱ्या इंधनदरांमुळे असे प्रश्न पडत असतीलच! त्यांची उत्तरे येत्या सोमवारी (२७ ऑगस्ट) ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात मिळवता येणार आहेत. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या संदर्भातील शंकांचे निरसन करणार आहेत. कार्यक्रमासाठी ‘एनकेजीएसबी बँक लि.’ प्रायोजक आहे.

गेल्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले. इंधनाची दरवाढ झाली की लगेच अनेक जीवनावश्यक वस्तू आणि सेवा महागतात आणि सामान्यांच्या मासिक खर्चाचे गणित चुकते. पेट्रोलवर सध्या विविध प्रकारचे कर आकारले जातात. ते रद्द करून जीएसटी लागू केल्यास दरांमध्ये लक्षणीय घट होऊन सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तरीही केंद्र सरकारने अद्याप हा निर्णय का घेतला नाही, हा निर्णय घेतल्यास राज्यांच्या तिजोरीवर त्याचा काय परिणाम होईल, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा इंधनदरांवर काय परिणाम होत आहे, अशा सर्व प्रश्नांची उकल या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. इंधनदरवाढ झाली की देशाचे राजकारण कसे तापवले जाते, आजवर त्याचे चटके कोणाला बसले, या मुद्दय़ावरील विविध राजकीय पक्षांच्या भूमिका कशा बदलत राहिल्या याचा आढावाही या कार्यक्रमात घेण्यात येईल. इंधनदरांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होतो. त्यामुळे त्यासंदर्भात अनेक शंका असतात. खनिज तेलाचे पेट्रोल, डिझेलमध्ये रूपांतर कसे केले जाते, या उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या देशांचे जागतिक पटलावरील महत्त्व किती आहे, जगाच्या अर्थव्यस्थेवर त्यांच्या संघटनेचा प्रभाव का आहे, येथपासून आपल्या जीवनाशी, दैनंदिन खर्चाशी त्याचा संबंध काय, इत्यादी अनेक मुद्दय़ांचे विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या विषयासंदर्भातील शंकांची उकलही श्रोत्यांना करून घेता येणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

  • कुठे? – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम).
  • कधी? – सोमवार, २७ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वाजता.

First Published on August 23, 2018 2:17 am

Web Title: loksatta vishleshan event in mumbai