डॉ. स्वाती कुलकर्णी यांचे लोकसत्ता व्हिवा लाउंजकार्यक्रमात प्रतिपादन

परराष्ट्र धोरण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. सरकार बदलले तरी परराष्ट्र धोरणाची दिशा पूर्णपणे बदलत नाही. परराष्ट्र धोरणाचे संदर्भ आणि कक्षा बदलल्या तरी मूल्ये बदलत नाहीत, असे प्रतिपादन भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमात केले. परराष्ट्र खात्याचा कारभार, परराष्ट्र सेवेत जाण्यासाठी करावी लागणारी तयारी, महिला अधिकारी म्हणून परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करताना आलेले अनुभव, कौटुंबिक आव्हाने या सर्वच गोष्टींवर डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि विलेपार्ले येथील ‘लोकमान्य सेवा संघा’च्या पु. ल. देशपांडे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली.

केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये यशाची शिखरे गाठणाऱ्या महिलांशी गप्पा मारण्याची संधी उपस्थितांना मिळते. या कार्यक्रमाचे ४० वे पुष्प बुधवारी विलेपार्ले येथे पार पडले. लंडन, दक्षिण आफ्रिका, स्पेन अशा विविध देशांमधील भारतीय दूतावासांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या परराष्ट्र खात्यातील अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारण्याची संधी या कार्यक्रमात प्रेक्षकांना मिळाली. या वेळी डॉ. कुलकर्णी यांचे स्वागत करण्यासाठी केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील आवर्जून उपस्थित होते.

नागपूरसारख्या शहरात एमबीबीएस डॉक्टर झाल्यानंतर वडिलांच्या मित्राने दिलेले आव्हान स्वीकारत आपण यूपीएससीची परीक्षा दिली होती, हे सांगताना डॉ. कुलकर्णी आठवणींमध्ये रमल्या. छोटय़ाशा शहरात स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळविण्यासाठीची धडपड, त्या काळात केलेले वाचन आणि स्पर्धा परीक्षा पार करण्याचे आव्हान दिलेल्या काकांनीच केलेले मार्गदर्शन असे अनेक टप्पे त्यांनी उलगडले.

प्रेक्षकांनीही काश्मीर प्रश्नापासून ट्रम्प यांच्या आगमनानंतर भारत-अमेरिका संबंधांवर होणाऱ्या परिणामांपर्यंत विविध प्रश्न डॉ. कुलकर्णी यांना विचारले. परराष्ट्र खाते हे नेहमीच आशावादी असते, या एका वाक्यात त्यांनी काश्मीर प्रश्नाला बगल दिल्यानंतर त्यांच्या मुत्सद्दीपणाची खात्रीच प्रेक्षकांना पटली. कौटुंबिक आघाडी, मुलांचे संगोपन अशा प्रश्नांची उत्तरे देतानाही त्यांच्यातील कर्तव्यदक्ष गृहिणी डोकावून गेली.

एका वेगळ्या क्षेत्रातील आणि विविध मुलखांतील अनुभव घेतलेल्या डॉ. कुलकर्णी यांच्याशी रंगलेल्या या गप्पा जमलेल्या तरुणांनाही करिअरची एक वेगळी वाट दाखवत होत्या. तब्बल दोन तास चाललेल्या या गप्पांच्या अखेरीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून डॉ. कुलकर्णी यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. (सविस्तर वृत्तांत पुढच्या शुक्रवारच्या व्हिवामध्ये )

आव्हानात्मक खाते..

परराष्ट्र खात्यात महिला अधिकारी म्हणून काम करताना कोणताही दुजाभाव जाणवत नाही, किंबहुना अनेकदा महिलांना प्राधान्यही दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले. देशाचे परराष्ट्र धोरण ठरविण्यात अधिकाऱ्यांचा थेट सहभाग नसला, तरी देशविदेशातील वकिलातींमधील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या बहुमोल माहितीवरच ते धोरण अवलंबून असते. देशाच्या आर्थिक प्रगतीतही इतर देशांशी असलेल्या हितसंबंधांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे हे खाते आव्हानात्मक आहे. तरुणांनी केवळ आयएएस आणि आयपीएस या दोनच वाटा न निवडता हा पर्यायदेखील विचारात घ्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.