धावपटू कविता राऊतची ‘व्हिवा लाउंज’मध्ये भावना

लग्न झाल्यानंतर कविताची कारकीर्द संपली असे टोमणे ऐकायले मिळाले होते. माझ्या कामगिरीत घसरण झाली होती. खेळ सोडावा असे विचार मनात येत होते, मात्र नवरा आणि सासरच्या कुटुंबीयांनी भक्कम पाठिंबा दिला. स्पर्धा, सराव, प्रवास यामुळे मी घरच्यांना वेळ देऊ शकत नाही. मात्र त्यांनी एकदाही तक्रार केली नाही. स्वयंपाक येतो का, हा प्रश्नही सासरच्यांनी विचारला नाही. लग्न झाल्यानंतर पाच दिवसांतच राष्ट्रीय शिबिरासाठी रवाना झाले. लग्नानंतर कारकीर्दीला खीळ बसते असा गैरसमज आहे, मात्र मी लग्नानंतर तीन वर्षांत ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. लग्नानंतरच कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली, असे उद्गार सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने काढले. मला बोलता येत नाही, धावता येते असे म्हणणाऱ्या कविताने दिलखुलास व्यक्त होत ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या गप्पांच्या मॅरेथॉन मैफलीच्या शर्यतीतही बाजी मारली.

अवघ्या पाचशे उंबऱ्यांचे गाव असलेल्या सावरपाडापासून क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च अशा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास उलगडताना कविताने अडथळे, समस्या यांचा एकदाही उल्लेख न करता उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचल्यावर सोयीसुविधा मिळतात. या गोष्टी तालुका स्तरावर मिळाल्या तर आपले खेळाडू पिछाडीवर पडणार नाहीत, असा विश्वास कविताने व्यक्त केला. अ‍ॅथलेटिक्समध्ये हळूहळू प्रायोजकांचे आगमन होते आहे. हरयाणाच्या बरोबरीने आपल्या राज्याची स्थिती चांगली आहे. मात्र सुधारणेला वाव असल्याचे कविताने स्पष्ट केले.

‘आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक पटकावल्यानंतर मागे तिरंगा फडकतो. एरवी फक्त सैनिकांना हा मान मिळतो. खेळाडू असल्यामुळे मला ही संधी मिळते याचं अप्रूप नेहमीच वाटतं. देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणारी मीही एक सैनिक आहे’, अशी भावना मनात असते हे सांगताना कविताच्या डोळ्यात वेगळीच चमक उपस्थितांना अनुभवायला मिळाली. कविता राऊत एक घडली हे उपयोगाचं नाही. म्हणून ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करेल अशी एक कविता घडवायची आहे. त्यासाठीच अकादमी स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काम करायची इच्छा आहे. म्हणून आदिवासी कार्यक्षेत्र मिळावे यासाठी निवेदन दिल्याचे कविताने सांगितले. मात्र बदल घडवण्यासाठी राजकारणात जायची इच्छा नसल्याचे कविताने ठामपणे सांगितले.

‘अनवाणी पायांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. अ‍ॅथलेटिक्समध्ये शूज महत्त्वाचे असतात. मात्र शूज घालून धावायला सुरुवात केल्यानंतर कामगिरी खालावली. शर्यतीला तयार होण्यासाठी वॉर्मअप आवश्यक असतो. असं काही असतं याची कल्पनाही नव्हती. कष्ट करायची तयारी असेल तर मदतीचे हात निर्माण होतात’, असे कविताने सांगितले. युवा पिढीने खेळाकडे कारकीर्द म्हणून नाही तर सुदृढ जीवनशैलीचा पर्याय म्हणून पाहावे, असा सल्ला कविताने युवा खेळाडूंना दिला.

मुंबई मॅरेथॉननंतर ध्यानाचं महत्त्व उमगलं

गेल्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. ४२ किलोमीटरच्या शर्यतीत चढणीचा टप्पा लागतो. त्या वेळी शर्यत पूर्ण करता यावी यासाठी देवाचा धावा केला. ही मॅरेथॉन पूर्ण होऊ दे. पुन्हा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार नाही असं अगतिकतेनं म्हटलं होतं. पूर्ण मॅरेथॉनच्या अनुभवानंतर ध्यानधारणेचं महत्त्व समजलं, असं कविताने आवर्जून नमूद केलं.