‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये ईशा आणि अपूर्वाचा रसिकांशी मुक्तसंवाद

प्रत्येक क्षेत्रात बरे-वाईट लोक असतात. अभिनय क्षेत्रही त्यास अपवाद नाही. या क्षेत्रात पाऊल टाकताच अनेकजण जुळवून घेण्याचे प्रस्ताव घेऊन येतात. मात्र, अंगभूत कलेच्या जोरावर पुढे जायचे की प्राप्त परिस्थितीशी दोन हात करत जिद्दीने उभे राहायचे, हे आपल्या हातात असते. अभिनय क्षेत्रात सगळेच वाईट आहे, असे समजू नका. अभियनय  क्षेत्रात या, पण संयमाने, स्वत:च्या हिंमतीने पुढे जाण्याची जिद्ध बाळगा. तुम्हाला यश मिळणारच, असा सल्ला अभिनेत्री ईशा केसकर आणि अपूर्वा नेमळेकर यांनी दिला.

आपल्या अनोख्या अदाकारीने रसिकांना मोहिनी घालणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील ईशा केसकर आणि ‘रात्रीस खेळ चाले’मधील अपूर्वा नेमळेकर यांनी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात  शनिवारी संध्याकाळी वसईच्या पारनाका येथील भंडारी नाटय़गृहात रसिकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. अभिनयातील कारकिर्दीचा पट उलगडतानाच या क्षेत्रात पाऊल टाकताना घ्यावयाची दक्षता, अपयश, सोशल मीडिया अशा विविध विषयांवर ईशा आणि अपूर्वाने निर्भीड मते मांडून रसिकांची मने जिंकली.

अभिनय क्षेत्रात अनेकवेळा पुढे जायचे असेल तर काहीजण जुळवून घेण्याचे प्रस्ताव घेऊन येतात. मलाही असे अनेक अनुभव आले. पण या प्रस्तावांना मी बळी पडले नाही. माझ्यात अंगभूत अभिनय गुण असताना मी कशाला नको त्या भानगडींमध्ये पडू असा विचार करत जिद्दीने उभी राहिले. फिल्म स्कूलमध्ये दाखल होण्याची माझी ऐपत नव्हती. त्यामुळे बराचकाळ केवळ अनुभव घेण्यासाठी नाटक, पथनाटय़ात फुकटात अभिनय केला. आज त्याच अनुभवाच्या जोरावर मी इथपर्यंत आले आहे, असे ईशाने सांगितले.

ईशाच्या अनुभवाचा धागा पकडून अपूर्वाने अभियनक्षेत्रात येताना अंगी कमालीचा संयम बाळगण्याचा तसेच नकार पचवण्याची ताकद ठेवण्याचा सल्ला दिला. अपूर्वाने याबाबतचा स्वानुभव कथन केला. ती म्हणाली, ‘मला बराच काळ नाटकात, मालिकांमध्ये काम मिळत नव्हते. कोणीतरी मला बोलावेल, अशा अपेक्षेने कामाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, सगळीकडून नकार वाटय़ाला येत होता. अशा परिस्थितीत खचून न जाता जिद्दीने चालत राहिले. यावेळी बाबांनीही मला खूप आधार दिला. ‘तुझे दिवस येतील’, असे बाबा मला नेहमी म्हणायचे. आज जिद्दीच्या जोरावरच माझ्या बाबांचे शब्द खरे ठरले आहेत.’ पडद्यामागील व्यक्ती म्हणजे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार आणि मदतनीस यांचीही प्रचंड मेहनत आणि परिश्रम असतात. मात्र हे लोक कधीही प्रकाशझोतात येत नाहीत. चर्चा फक्त आमची, कलाकारांचीच होते अशी कबुली अपूर्वाने दिली. समाज माध्यमांवरील टीका-टिप्पणी, व्यक्तिगत पातळीवरील टीका, त्यातून येणारे वैषम्य यावरही या दोघींनी मतप्रदर्शन केले.