राज्यातील नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची मुंबईतील गिरगावातील साहित्य संघ मंदिरात होणारी महाअंतिम फेरी झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरही २० डिसेंबरला पाहता येणार आहे.
अस्तित्त्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व झी मराठी वाहिनीकडे असेल. या वाहिनीवरील रविवारच्या नाटय़विषयक ‘नक्षत्र’ या कार्यक्रमात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण होईल. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीपासूनच स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांवर आयरीस प्रॉडक्शन या टॅलेंट पार्टनरची नजर असेल.
दरम्यान,  राज्यभरातील केंद्रांवर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर असल्याने भाग घेण्यासाठी आता फक्त शेवटचे चारच दिवस उरले आहेत.  लोकसत्ता लोकांकिका
या राज्यस्तयरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे प्रवेश अर्ज
दाखल करण्याची मुदत सुरू झाल्यानंतर विविध केंद्रांवर अनेक अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
सर्वच महाविद्यालयांमध्ये
एकांकिकांचा सरावही जोरात सुरू आहे.
अर्ज स्वीकृतीचे चारच दिवस
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे अर्ज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, रत्नागिरी आणि औरंगाबाद या आठही केंद्रांवर दाखल होत आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसंदर्भात कोणतेही प्रश्न, शंका असतील; तर त्या सर्वाची उत्तरे लोकसत्ताच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेचा प्रवेश अर्ज, नियम आणि अटी लोकसत्ताच्या www. loksatta. com/lokankika या संकेतस्थळावर मिळतील. तसेच प्रत्येक केंद्रावरील प्राथमिक फेरीपासून ते मुंबईतील महाअंतिम फेरीपर्यंत स्पर्धेचे सर्व वेळापत्रकही संकेतस्थळावर आहे.