खासगी संकुलास थेट जोडणी

मुंबई : मेट्रो मार्गिकेजवळील खासगी संकुलास मेट्रो स्थानकातून थेट जोडणी धोरणाअंतर्गत मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिकेवर तब्बल सव्वा किमी लांबीचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. तर दुसरा पादचारी पूल अर्धा किमीचा असेल. त्यामुळे या दोन संकुलांतील प्रवाशांना रस्त्यावरील वाहतुकीत न अडकता थेट मेट्रो स्थानकापर्यंत जाता येईल.

मेट्रो स्थानकातून मार्गिकेजवळील खासगी संकुलांना थेट जोडणीच्या धोरणास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जुलैच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यापूर्वी या वर्षी जानेवारीत हे धोरण तयार करण्यात आले होते. या संदर्भात एमएमआरडीएकडे मेट्रो ७ मार्गिकेसाठी चार प्रस्ताव आले होते. त्यापैकी दोन प्रस्तावांस नुकतीच मंजुरी मिळाली. आरे मेट्रो स्थानकाजवळ ओबेरॉय मॉलपर्यंत आणि पोयसर मेट्रो स्थानकापासून सरोवा प्रॉपर्टीजपर्यंत दोन पादचारी पूल बांधले जातील असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरे स्थानक ते ओबेरॉय मॉल हा पादचारी पूल १३०० मीटरचा असेल तर पोयसर स्थानक ते सरोवा ५१४ मीटर असेल. यासंदर्भातील आरखडय़ास एमएमआरडीएची मंजुरी मिळाली की त्यांचे बांधकाम सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या दोन्ही पुलांचा बांधकाम खर्च हा खासगी संकुलांना करावा लागेल, मात्र बांधकामानंतर मालकी हक्क एमएमआरडीएकडे राहील. या पादचारी पुलांचा वापर अन्य व्यक्तींसाठी करणे, तसेच जाहिरात उत्पन्न याचे अधिकारदेखील प्राधिकरणाकडे असतील.

मेट्रो २ ए (दहिसर ते डीएन नगर) मार्गिकेवरदेखील अनेक मॉल तसेच व्यापारी संकुले आहेत. मात्र सध्या त्यासंदर्भात एकही प्रस्ताव आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. करोना आणि टाळेबंदीमुळे एकूणच व्यवहार थंडावले असल्याने प्रतिसाद मिळाला नसला तरी भविष्यात अशी मागणी झाल्यास त्याप्रमाणे थेट जोडणी केली जाईल असे त्यांनी नमूद केले.

कामाला वेग

टाळेबंदीच्या काळात मजुरांअभावी मेट्रो प्रकल्पांचे काम मंदावले होते. गेल्या दोन महिन्यांत मजूर परतले असून कामाला वेग आला आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो २ (दहिसर ते डीएन नगर) या दोन मार्गिका यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मे २०२१ हे सुधारित उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याचबरोबर यापैकी मेट्रो ७ मार्गिकेवर खासगी संकुलांच्या थेट जोडणीसदेखील मंजुरी देण्यात आली आहे.