19 February 2019

News Flash

हजारांसाठी शेकडय़ाने रांगा!

बँक उघडल्यानंतर कधी एकदा आपल्याकडील या नोटा बदलून घेतो, अशी घाई त्यांना झाली होती.

नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची बँकांबाहेर झुंबड; सुटय़ा नोटांच्या मुद्दय़ावरून बँक कर्मचाऱ्यांशी खटके

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी सकाळी बँकांच्या शाखा कार्यालयांसमोर गुरुवारी पहाटेपासून नागरिकांची रांग लागल्याचे चित्र अवघ्या शहरभर दिसून आले. ‘नोटा बाद होतील’ या भीतीने आपल्याजवळील नोटा बदलण्यासाठी तसेच खात्यात पैसे भरण्यासाठी ग्राहकांनी केल्या गर्दीमुळे अनेक बँकांच्या व्यवहारात अडचणी येत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच हलकल्लोळ उडाला होता. गुरुवार, १० नोव्हेंबरपासून बँका आणि टपाल कार्यालयांतून या नोटा बदलून मिळतील, असे जाहीर करण्यात आले होते. खिशात पैसे आहेत, पण पाचशे व हजारच्या नोटा कोणीही घेत नसल्याने सर्वसामान्य लोक हवालदिल झाले होते. त्यामुळे गुरुवारचा दिवस उजाडताच लोकांनी आपापले खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. बँकांची दारे उघडण्यापूर्वीच ही रांग रस्त्यावर लांबपर्यंत पोहोचल्याचे दृश्य गुरुवारी जागोजागी दिसले. काही ठिकाणी नागरिकांनी रांगेची शिस्त मोडून बँकांत घुसण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. या गर्दीला आवर घालणे बँक कर्मचारी व सुरक्षारक्षकांनीही अशक्य होत होते.

बँक उघडल्यानंतर कधी एकदा आपल्याकडील या नोटा बदलून घेतो, अशी घाई त्यांना झाली होती. या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे, तसेच सोबत आधार किंवा पॅनकार्ड असणे जरुरीचे होते. काही बँकांमध्ये सगळ्या लोकांना विहित नमुन्यातील अर्ज देणे शक्य झाले नाही. त्यामुळे ग्राहक आणि बँक अधिकारी-कर्मचारी यांच्यात खटके उडाले. नोटा बदलून घेण्यासाठीच्या रांगेत ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींची संख्या लक्षणीय होती. काही नोकरदारांनी कार्यालयाला दांडी मारून नोटा बदलण्याच्या कामाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. नोटा बदलून घेण्यासाठी काही बँकांमध्ये ‘टोकन सिस्टम’चा वापर करण्यात आला. काही बँकांमध्ये या कामासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात आल्या होत्या. उपनगरांप्रमाणेच दक्षिण मुंबईतील काही उच्चभ्रू विभाग तसेच विविध कॉर्पोरेट कार्यालये असलेल्या विभागातील बँकांमध्येही मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.

सोशलचिमटे

पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्यात आल्याच्या घोषणेनंतर ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वर विविध संदेशांचा पूर आला होता. तसेच संदेश बुधवारी रात्रीपासून सोशल मीडियावर फिरायला सुरुवात झाली होती. ‘बँकेत नोटा बदलण्यासाठी जात आहात. सोबत पाण्याची बाटली, जेवणाचा डबा घेऊन जा’, ‘बँकेत नोटा बदलून घेताना रांगेत शिस्तीत उभे राहावे. मला आरक्षण आहे मी पहिल्यांदा बदलून घेईन, असे चालणार नाही’, ‘आज बँक मे जाओ तो एक चीज साथ में जरूर ले जाना.. टिफिन’, अशा संदेशांचा यात समावेश होता.

हॉटेलांतील खादाडी निम्म्याने घटली!

एरवी रात्री उशिरापर्यंत गजबज असलेल्या मुंबईतील उपाहारगृहे आणि हॉटेलांना ‘नोटाबंदी’चे चटके चांगलेच बसत आहेत. सुटे करण्याच्या इराद्याने पाचशे/हजारच्या नोटा घेऊन हॉटेलांत खादाडीला येणाऱ्यांना ‘नोटाबंदी’च्या पाटय़ा पाहून परतावे लागत होते. त्यामुळे गुरुवारी ग्राहकांनी हॉटेलांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. उपाहारगृहांतील ग्राहकांचे प्रमाण निम्म्याने घटल्याचा दावा व्यावसायिक करत आहेत.

नोटाबंदी जाहीर झाल्यापासून नागरिक मिळेल त्या ठिकाणाहून  नोटा बदलण्यासाठी धावत आहेत. हॉटेले व उपाहारगृहेही त्याला अपवाद नव्हती. मात्र, सुटय़ा पैशांची टंचाई आणि आपल्याजवळील नोटा बाद होण्याची भीती यामुळे हॉटेल व्यावसायिकांनीही पाचशे व एक हजारच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. एक तर सुटे पैसे द्या अथवा डेबिट-क्रेडिट कार्डाने बिल भरा, असे ग्राहकांना सांगण्यात येत आहे. यात सुटे मिळवण्याचा हेतू साध्य होत नसल्याने ग्राहकांनी आता हॉटेलांकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. दादर येथील आस्वाद, गोमांतक, प्रकाश या उपाहारगृहांत खवय्यांची कायम गर्दी असते. मात्र दोन दिवसांमध्ये या उपाहारगृहांत शुकशुकाट होता.

‘प्रत्येकाला सुटे देण्यासाठी आमच्याकडे नोटा उपलब्ध नसून पाचशे रुपये सुटे करण्यासाठीही आमच्याकडे विचारणा केली जात आहे,’ असे मुलुंड पूर्व येथील मंडप उपाहारगृहाचे मालक गौतम जैन यांनी सांगितले. ‘गेल्या दोन दिवसांत आमच्या व्यवसायावर ३० ते ४० टक्के परिणाम झाला असून अजूनही पाचशे-हजारच्या नोटा घेऊन ग्राहक येत आहेत. सर्व स्थिर होण्यासाठी किमान ५ ते ७ दिवस जातील,’ असे आराम उपाहारगृहाचे मालक कौस्तुभ तांबे यांनी सांगितले.

First Published on November 11, 2016 2:16 am

Web Title: long queue for 500 1000 notes changing