‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०११ मध्ये काढलेल्या सोडतीतील प्रतीक्षा नगर (टप्पा ४) येथील मध्यम उत्पन्न गटातील १९६ घरांच्या इमारतीलाही आता महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिल्याने प्रतीक्षा नगरच्या यशस्वी अर्जदारांची गेल्या दोन वर्षांची घराच्या ताब्याची प्रतीक्षा आता संपली आहे.
‘म्हाडा’ने २०११ मध्ये काढलेल्या सोडतीत ३३६ घरे तयार होती. तर ३६९८ घरांचे बांधकाम सुरू होते. ते झाल्यानंतरही गेल्या दोन वर्षांत भोगवटा प्रमाणपत्राअभावी या घरांचा ताबा रखडला होता. लोकांनी कर्ज काढून ९० टक्के रक्कम भरली होती त्यामुळे घरही नाही आणि आर्थिक भरूदड सुरू अशी अवस्था होती. गेल्या काही दिवसांत २०११ च्या सर्व योजनांतील इमारतींना महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे ३६९८ पैकी ३५०२ घरांच्या ताब्याचा प्रश्न सुटला होता. आता या १९६ घरांचाही प्रश्न सुटला आहे.