ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांनी निवडणुकीत सादर केलेले जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्याने महापालिका प्रशासनाने बुधवारी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. या निर्णयामुळे सत्ताधारी शिवसेनेला धक्का बसला असून शिवसेनेचे संख्याबळ एकने घटले आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत माजिवडा येथील प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेनेचे उमेदवार लॉरेन्स डिसोजा विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांचा पराभव केला होता. डिसोजा यांनी जात प्रमाणपत्रामध्ये ईस्ट इंडियन कॅथॉलिक जात नोंदवली होती. मात्र, डिसोजा यांच्या जात प्रमाणपत्रावर भोईर यांनी आक्षेप घेत यासंबंधी कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे दाद मागितली होती. तिथे डिसोजा यांच्या बाजूने निर्णय लागला होता. त्यामुळे त्याविरोधात भोईर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. बनावट, चुकीची व खोटी कागदपत्रे सादर करून डिसोजा यांनी प्रमाणपत्र मिळविल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे न्यायालयाने ते जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. दरम्यान, या निर्णयाविरोधात डिसोजा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांची मुदत देत ते प्रमाणपत्र कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडून तपासून घेण्याचे आदेश दिले. डिसोजा यांनी मुदत संपूनही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद संपुष्टात आले असून तसे पत्र अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी बुधवारी त्यांना पाठविले आहे.