शुक्रवारी मध्यरात्रीपासून कर्मचारी कामावर रुजू; भाऊबीजेला प्रवाशांना दिलासा

पहाटे पहिली गाडी धावली

सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग व अन्य मागण्यांसाठी १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून पुकारलेला संप एसटी कामगार संघटनांनी अखेर शुक्रवारी मध्यरात्री मागे घेतला. संप बेकायदा असल्याचे मत न्यायालयाने नोंदवल्याने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाचे १२५ कोटींचे उत्पन्न बुडाले. शनिवारी भाऊबीजच्या दिवशी प्रवाशांचा एसटीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने चांगले उत्पन्न मिळण्याची आशा महामंडळाला आहे.

गर्दीच्या हंगामानुसार एसटी महामंडळाकडून यंदा बस भाडय़ातही वाढ करण्यात आली होती. एसटी महामंडळाकडून जादा बसही सोडण्यात आल्या होत्या. मात्र दिवाळीच्या महत्त्वाच्या चार दिवसांतच हा संप झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. दररोज होणाऱ्या ५८ हजार ७८० फेऱ्यांपैकी चार दिवसांत मोजक्याच फेऱ्या झाल्या. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेपर्यंत जास्तीत जास्त बस चालवून उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी  महामंडळाला २३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.

* चार दिवस ठप्प असलेली राज्यातील एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी एसटीचे कर्मचारी व कामगार मध्यरात्रीपासूनच कामावर हजर होण्यास सुरुवात झाली. राज्यातील पहिली एसटी ही पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी मलकापूर ते औरंगाबाद धावली. त्यामुळे भाऊबीजच्या दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला. या संपात सर्वाधिक फटका बसलेल्या  ग्रामीण भागातील नागरिकांचीही यातून सुटकाच झाली.

* मागण्यांसाठी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना, विदर्भ एसटी कामगार संघटना यांनी संपाची हाक दिली होती. संपाची नोटीस कामगार संघटनांकडून देण्यात येऊनही एसटी महामंडळाची काहीच पूर्वतयारी नसल्याचे दिसून आले. कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतरही संप सुरूच राहिला होता.

नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या

दररोज होणाऱ्या ५८ हजार ७८० फेऱ्यांपैकी संपाच्या पहिल्या दिवशी अवघ्या ६८१ फेऱ्याच झाल्या. एसटी सेवा पूर्ववत होत नसल्याचे दिसताच खासगी बसचा आधार महामंडळाने घेतला व ३,८५८ बसची सोय प्रवाशांसाठी केली. पहिल्या दिवशी ६८५ बस धावल्या असतानाच संपाच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या सातच फेऱ्या झाल्या. तिसऱ्या व चौथ्या दिवशी तर एसटी पूर्णपणे ठप्प झाली. संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ व एसटी कामगार संघटनेत एक दिवस बैठकीच्या १३ फेऱ्या झाल्या व मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू असलेली बैठक कोणताही तोडगा न निघताच संपली.संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने चालक, वाहकाचे विश्रामकक्ष बंद करण्याबरोबरच, खाजगी बस, कंत्राटी कामगार व गृहरक्षकांची नियुक्त करण्याचा पर्यायही शोधला. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर  व आदेशाचे पालन करत संघटनांनी शुक्रवारी मध्यरात्री संप मागे घेतला.

सेवा पूर्ववत होण्यास वेळ

ग्रामीण भागाला तर मोठा फटका बसला होता आणि संप मागे घेतल्याने येथील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. गेल्या चार दिवसांत एसटीचे वेळापत्रक पूर्ण विस्कळीत झाल्याने सेवा पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ११ हजार ३०७ बस फेऱ्यांपैकी ४ हजार ७६ फेऱ्या झाल्या होत्या. तर दुपारी दोनपर्यंत २४ हजार ५१५ बस फेऱ्या झाल्या.

संप यशस्वी झाला आहे. आता एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून, त्यांचाकडून योग्य न्याय मिळेल हीच अपेक्षा. या समितीकडून समाधानकारक वेतनवाढ न मिळाल्यास जानेवारी २०१८ मध्ये पुन्हा संप पुकारण्यात येईल.

– संदीप शिंदे       (अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना)