महिन्याभरात १५६६ मुलामुलींची सुटका; १४८१ बालके पालकांच्या ताब्यात

आईवडिलांच्या ओरडय़ाला कंटाळून किंवा घाबरून, मुंबईत जाऊन शाहरुख खानसारखे बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून किंवा गर्दीत आईवडिलांचा हात सुटून अनेक अर्थानी चुकलेली मुले मुंबईच्या मायानगरीत येतात. ही चुकलेली जहाजे कधीकधी या मायानगरीत भरकटतात, तर कधी चुकीच्या धक्क्याला लागतात. मात्र या चिमुकल्यांना त्यांच्या मायेची सावली पुन्हा मिळवून देण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी आखलेली मुस्कान मोहीम प्रचंड यशस्वी ठरली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान घेतलेल्या या मोहिमेत १५६६ बालकांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यापैकी १४८१ जणांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले.

विविध आमिषांना बळी पडून मुंबईत आलेल्या किंवा हरवून या शहरात येऊन पडलेल्या मुलांची संख्या प्रचंड आहे. ही मुले शहरातील पदपथांवर, बकाल वस्त्यांमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर हमखास आढळतात. कधीकधी स्थानिक गुंड यांना हाताशी घेऊन वाईट मार्गालाही लावतात. अशा मुलांना त्यांचे हक्काचे घर पुन्हा मिळवून देण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी लोहमार्ग पोलीस आयुक्त मधुकर पाण्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुस्कान मोहीम’ सुरू केली.या मोहिमेद्वारे एका महिन्यात १११८ मुले आणि ४४८ मुली पोलिसांनी ताब्यात घेतली. यापैकी सर्वाधिक म्हणजे ३४८ बालके मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोडवण्यात आली आहेत. त्याखालोखाल मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस (२६१), वांद्रे (२०२), दादर (१२४) आणि कुर्ला (९६) या स्थानकांचा समावेश आहे. या बालकांपैकी १५४ बालके ही परराज्यांतून आली होती.

ठाण्यात ८८ मुलांची घरवापसी

घरापासून दुरावलेल्या मुलांना स्वगृही पाठवण्यासाठी पोलिसाच्यावतीने राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’या मोहिमेतून सुमारे ८८ जणांना स्वगृही पाठवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयातून सुमारे ७७ जणांची तर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून ११ जणांची त्यांच्या कुटूंबियांशी भेट घालून देण्यात आली.