लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : टाळेबंदीत खाकराविक्रीचा व्यवसाय थांबला म्हणून थेट मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करून मुंबईत विकण्याचा धंदा करणाऱ्या एकाला मुलुंड परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. संजय कुमार तिवारी (३९) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

तिवारी हा खाकराविक्रीचे काम करत असे. टाळेबंदीनंतर रोजगार गेल्यानंतर त्याने पिस्तुलविक्रीचे काम सुरू केले. मध्य प्रदेशातून ही पिस्तुले खरेदी करून मुंबईत विकण्यासाठी आला होता. याबाबत एक जण मुलुंड परिसरात पिस्तुलविक्रीकरिता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या पथकाने सापळा रचून पोलिसांनी तिवारी याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतूस पोलिसांना सापडले. याप्रकरणी खरेदीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.