‘कोकण म्हाडा’च्या ठाणे, विरार, मीरा रोड आदी ठिकाणच्या ४,२७५ घरांसाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सदनिकांच्या विक्रीसाठीची जाहिरात उद्या १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून ऑनलाइन नोंदणी १३ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली.
कोकण मंडळ म्हाडातर्फे विरारमधील ३,७५५, ठाण्यात बाळुकम येथील १९, कावेसर येथील १६४, मीरा रोड येथील ३१०, तर वेंगुर्ला येथील २७ घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटातील ३२९, अल्प उत्पन्न गटातील २,६३०, मध्यम उत्पन्न गटातील १,३११ आणि उच्च उत्पन्न गटातील ६ सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांच्या विक्रीसाठी मंगळवारी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात येणार असून ऑनलाइन नोंदणी बुधवार, १३ जानेवारीपासून, तर ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात १५ जानेवारीपासून होईल. ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी, तर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ फेब्रुवारी असेल. ज्या घरासाठी अर्ज केला आहे त्यासाठी ऑनलाइन पैसे भरण्याची मुदत ९ फेब्रुवारी, तर डीडी किंवा पे ऑर्डरने पैसे भरण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे. घरांसाठी आलेल्या अर्जाची तात्पुरती यादी १६, तर अंतिम यादी १९ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल, असेही मेहता यांनी सांगितले.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३२९ सदनिका उपलब्ध असून त्यासाठी ५,३०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या घराची साधारण किंमत ४ ते १२ लाख रुपयांदरम्यान आहे. अल्प उत्पन्न गटासाठी २,६२९ घरे असून त्यासाठी १०,३०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या घरांची किंमत साधारणत: १८ ते २४ लाख रुपयांपर्यंत आहे. मध्यम उत्पन्न गटासाठीच्या १,३११ सदनिका असून त्यासाठी १५,३०० रुपये अनामत शुल्क ठेवण्यात आले आहे. या गटातील एका सदनिकेची किंमत वेंगुर्ला येथे १८ लाख, तर विरार येथे ४१ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या सोडतीमध्ये उच्च उत्पन्न गटातील केवळ ६ घरे वेंगुर्ला येथे असून त्याची किंमत साधारणत: ४१ लाखांच्या आसपास असेल. त्यासाठी १५,३०० रुपये अनामत शुल्क भरावे लागणार आहे. सर्व घरांसाठी अर्जाचे शुल्क ३०० रुपये असेल.