मुंबईत अंधेरी येथील ‘लोटस पार्क’ या २२ मजली टोलेजंग व्यावयासिक इमारतीला लागलेल्या आगीला इमारतीचे मालकच सर्वस्वी जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सिताराम कुंटे यांनी दिले आहे.
इमारतीची अग्नीशमन यंत्रणा निकामी झाली होती तसेच देखभाल व्यवस्थाही योग्य नसल्याचा खुलासाही कुंटे यांनी यावेळी केला. इमारतीत सुरक्षेच्या बाबतीत बाळगल्या गेलेल्या निष्काळजीपणामुळे अपघाताला भीषण स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे इमारतीच्या मालकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचेही कुंटे म्हणाले. तसेच या अग्नितांडवात शहीद झालेले अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर यांच्या कुटुंबियांना पालिकेकडून १५ लाखांची मदत दिली जाणार असल्याचीही माहिती कुंटे यांनी यावेळी दिली. तर, जखमी २१ जवानांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.
या घटनेमुळे आणि पालिका आयुक्तांनी इमारतीच्या सुरक्षेबाबत केलेला खुलासा यातून मुंबईतील टोलेजंग इमारतींच्या बाबतीत बाळगण्यात येणाऱया सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.