रोहा-दिवा पॅसेंजर गाडीतील अमूकअमूक महिलच्या सामानात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी मंगळवारी पहाटे रोहा रेल्वेस्थानक अधीक्षकांच्या कार्यालयात खणखणला आणि प्रवाशांसह रेल्वे व स्थानिक प्रशासन या सर्वाचीच झोप उडाली. तपासाअंती बॉम्बची ही निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले. हा सर्व प्रकार प्रेमभगांतून आलेल्या नैराश्येपोटी केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोहा-दिवा पॅसेंजर गाडी मंगळवारी पहाटे रोह्यावरून सुटण्याच्या तयारीत होती. एवढय़ात स्थानक अधीक्षकांचा दूरध्वनी खणखणला. रोहा पॅसेंजरमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सामानात बॉम्ब असल्याचे दूरध्वनीवरील व्यक्तीने सांगितले आणि तातडीने फोन ठेवून दिला. दूरध्वनी करणाऱ्याने आपले नाव जीतेंद्र म्हात्रे असेही सांगितले. जीतेंद्रच्या दूरध्वनीमुळे खळबळ उडाली. तातडीने गाडीतील प्रवाशांना खाली उतरवून घेण्यात आले. त्यांच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आले. पनवेलहून श्वानपथकही आले. मात्र, या सर्व तपासानंतर काहीही हाती लागले नाही. अखेरी बॉम्बची अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.  दरम्यान, हा दूरध्वनी कोठून आला आणि कोणी केला, याबाबत शोध केला असता हा दूरध्वनी परदेशातून आला असल्याचे स्पष्ट झाले. जीतेंद्र म्हात्रे हे नाव खोटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे मुंबई विभागीय प्रमुख आलोक बोहरा यांना विचारले असता संपूर्ण अफवा ही प्रेमभंगाच्या निराशेतून पसरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही महिला विवाहित असून तिचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. तिचा प्रियकर आखाती देशांमध्ये नोकरीला गेल्यानंतर त्यांच्यात तणाव निर्माण झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोहरा म्हणाले.