मध्य प्रदेशातील घर सोडलेल्या अल्पवयीन मुलीची इच्छा अपुरी
अभिनेता सलमान खान याला भेटण्याच्या इच्छेने मध्य प्रदेशातील घर सोडून मुंबईत दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीला वांद्रे पोलिसांनी डोंगरी येथील बालसुधारगृहात धाडले.
नववीत शिकणाऱ्या मुलीने रविवारी मध्य प्रदेशातील घर सोडले. मुंबईत येणारी एक्स्प्रेस पकडली. मंगळवारी सकाळी वांद्रे टर्मिनन्स येथे उतरून तिने थेट पाली हिल येथील गॅलेक्सी अपार्टमेन्ट गाठले. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनी तिला रोखले. काही क्षणांसाठी सलमानला भेटू द्या अशी विनंती ती वारंवार करीत होती. मात्र सलमान घरी नाही, असे सांगून सुरक्षा रक्षकांनी तिला धुडकावून लावले. त्यानंतर या मुलीने शेजारच्या इमारतीत प्रवेश मिळवला. तेथून गॅलेक्सी इमारतीत प्रवेश करण्यासाठी तिने संरक्षक भिंतीवरून उडी मारली. मात्र इमारतीतील सुरक्षा रक्षकांनी तिला पुन्हा अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
वांद्रे पोलिसांनी मुलीकडे चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. वैद्यकीय चाचणी करून तिला डोंगरी येथील बालसुधारगृहात धाडले. तसेच तिच्या पालकांना आणि संबंधित पोलीस ठाण्याला मुलगी सापडल्याचा निरोपही दिला. पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोधाशोध सुरू केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 5, 2018 5:37 am