‘लोकसत्ता’च्या वतीने कलावंत-कवींचा अनोखा शब्दाविष्कार; सर्व रसिकांना निमंत्रण

मुंबई : मराठी कवितेचे सुवर्णसंचित अनुभवण्याची संधी रसिकांना ‘लोकसत्ता’च्या वतीने आज ठाण्यात होणाऱ्या ‘अभिजात’ उपक्रमात मिळणार आहे.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
issues of society
शब्द शिमगोत्सव
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

कलावंत- कवींचा शब्दाविष्कार एकाच व्यासपीठावर ऐकण्या-पाहण्याचा हा दुर्लभ योग पहिल्यांदाच जुळून आला असून या रंगमंचावरून नाना पाटेकर, किशोर कदम ‘सौमित्र’, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, स्वानंद किरकिरे, प्रतीक्षा लोणकर या काव्यवंतांच्या शब्दकळांचे अनोखे सादरीकरण होणार आहे. त्यांच्यासह अशोक नायगावकर, नीरजा आणि मिलिंद जोशी हे मान्यवर कवीही या काव्यांगणात सहभागी आहेत.

‘माझ्या मना बन दगड’ असं जळजळीत वास्तव मांडणारे विंदा करंदीकर, ‘नको नको रे पावसा’ असे पावसाला अवेळी धिंगाणा न घालण्याचे आर्जव करणाऱ्या इंदिरा संत, ‘अजुनि रुसुनि आहे’ म्हणत साऱ्या भावविश्वाचा खेळ मांडणारे अनिल, ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ असे सांगणारे ना. धों. महानोर, ‘क्षितिज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी’ असे लिहिणारे ग्रेस, ‘आसवांनी मी मला भिजवू कशाला, एवढेसे दु:ख मी सजवू कशाला’ अशी गझल लिहिणारे सुरेश भट, ‘देता यावे शब्द, अम्लान नि:संशय’ असे सांगणाऱ्या अरुणा ढेरे.. मराठी कवितेला समृद्ध करणाऱ्या अशा कवींच्या कविता, हे कुणाही वाचकासाठी सुखनिधानच. कवितेच्या किती छटा आणि किती तऱ्हा. कवितांचे हे लेणे हा मराठी भाषेचा सर्वसुंदर अलंकार. या काव्यछटांचे विविध आविष्कार या व्यासपीठावरून सादर होणार आहेत.

जगण्याचे तत्त्वज्ञान सहज शब्दांत मांडताना विंदा करंदीकर लिहितात..

असे जगावे दुनियेमध्ये

आव्हानाचे लावुनी अत्तर

नजर रोखुनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर

भावना आणि कल्पना हातात हात घालून शब्दखेळ करू लागल्या, की निर्माण होणाऱ्या अपूर्व अनुभवातून साकार होणाऱ्या नाना छटांच्या कवितांचा हा कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

कवितेच्या नाना शब्दकळा..

पडदा आणि सामाजिक जीवनातून रांगडी छबी आपल्या सगळ्यांवर पाडणारे नाना पाटेकर शब्दांवर उत्कट प्रेम करणारे कलावंत आहेत. ‘कविता ही फक्त कवींचीच मक्तेदारी असते का?’ असे मानणाऱ्या नाना पाटेकर यांच्यातील हळव्या कवीची या रंगमंचावरून ओळख होऊ शकेल. इतर प्रतिभावंतांचा काव्याविष्कार हीदेखील अनोखी पर्वणी आहे.

प्रवेशिका कार्यक्रमाआधी..

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेशमूल्य नसले, तरीही त्यासाठीच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी उपलब्ध होणार आहेत.

प्रायोजक

या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी, मँगो हॉलिडेज आणि रुणवाल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स, टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा,  हॉस्पिटलिटी पार्टनर हॉटेल खवय्ये आणि आय केअर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे आहेत.