जगातील सर्वात कमी किंमतीची आणि कमी वजनाची असा दावा असलेल्या भारतीय बनावटीची कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेंटिलेटर) अतिदक्षता विभागातील करोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी असक्षम असल्याचे जेजे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने स्पष्ट  केले आहे.तसा अहवालच डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दिला आहे.

जे.जे. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाला एका सामाजिक संस्थेकडून ही ८१ यंत्रे दान स्वरुपात मिळाली होती. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून याच कंपनीची दहा हजार यंत्रे केंद्र सरकारने खरेदी केली आहेत.

एका सामाजिक संस्थेने दिल्लीस्थित अ‍ॅग्वा हेल्थकेअर कंपनीकडून ८१ कृत्रिम श्वसनयंत्रे खरेदी करत जे.जे. रुग्णालयाला ४२ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाला ३९ यंत्रे गेल्या महिन्यात दान केली होती. चाचणीमध्ये या यंत्रामधून होणाचा ऑक्सीजनचा पुरवठा सलग एका दाबाने होत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही यंत्रे वापरण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. मात्र ही यंत्रे वापरण्याबाबत अनेकवेळा दबाव येत असल्याने अखेर रुग्णालयाने पाच तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमली होती.

समितीच्या अहवालानुसार, ही यंत्रे १०० टक्के ऑक्सीजन पुरवठा करत नाहीत. यामुळे रुग्णाला आवश्यक त्या प्रमाणात, दाबाने ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील एक यंत्र सुरू केल्यानंतर पाच मिनिटातच बंद पडले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ही यंत्रे अतिदक्षता विभागात बसविताना अनेक अडचणी येत होत्या. यातील सॉफ्टवेअर त्यावेळी अद्ययावत करण्यात आले. याचा अर्थ कंपनीने याचा दर्जा आणि अन्य तांत्रिक चाचण्या केल्या नसल्याचे समितीने निदर्शनास आणले आहे. यंत्रातून प्रत्यक्ष पुरविला जाणाऱ्या ऑक्सीजनची पातळी आणि स्क्रीनवर दाखविली जाणारी पातळी यात मोठी तफावत दिसून आली. आवश्यक दाबाने ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्याने रुग्ण अधिक अत्यवस्थ झाला. त्याला घाम आला, असे अहवालात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या समित्यांचाही नकारात्मक अहवाल

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरच्या सहकार्याने स्थापित केलेले अ‍ॅग्वा हेल्थकेअर हे भारतातील छोटे स्टार्टअप आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या दोन समित्यांनीही अ‍ॅग्वा कंपनीच्या यंत्राची क्षमता आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असा अहवाल केंद्र सरकारला १ जूनला दिलेला आहे. यासंबधी अ‍ॅग्वा हेल्थकेअर  कंपनीशी वारंवार संपर्क  साधूनही  स्पष्टीकरण मिळालेले नाही.