News Flash

लोअर परेल रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

पुलाखालील खामकर मंडईतील गाळे जमीनदोस्त

डिलाईल पुलाखालील खामकर मंडईतील १७२ व्यावसायिक गाळय़ांवर शुक्रवारी पालिकेने कारवाई केली.

पुलाखालील खामकर मंडईतील गाळे जमीनदोस्त

लोअर परेल रेल्वे स्थानकावरील धोकादायक डिलाईल पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या पुलाखालील खामकर मंडईतील १७२ व्यावसायिक गाळे पालिकेच्या जी दक्षिण विभागाने शुक्रवारी तोडले आहेत.

गाळेधारक दुकानदार जागा सोडण्यास तयार नसल्यामुळे पालिका प्रशासनाच्या नाकी नऊ  आले होते आणि या पुलाचे कामही रखडले होते. मात्र गाळे तोडल्यामुळे आता या पुलाच्या पुनर्बांधणीला वेग येणार आहे. सोमवारपासून या पुलाचा उताराचा भागही तोडण्यात येणार आहे.

अंधेरीतील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आयआयटीच्या सल्लगारांच्या सहकार्याने रेल्वे मार्गावरील पुलांचे सर्वेक्षण केले होते. त्यात लोअर परेल स्थानकावरील डिलाईल पूल अतिधोकादायक असल्याचे आढळले होते. त्यामुळे तो बंद करण्यात आला होता. त्यानंतर रेल्वेने गर्डरही काढून टाकले होते. मात्र पुलाच्या उताराकडील भाग काढून टाकण्याचे काम रखडले होते.

या पुलाच्या खाली पूर्वेकडे १६ झोपडीधारक होते, तर पश्चिमेकडे खामकर मंडईतील १७२ गाळेधारक होते. त्यांनी विरोध केल्यामुळे पूल पाडण्याचे रखडले होते. पालिका प्रशासनाने गाळे रिकामे करून शुक्रवारी ते जमीनदोस्त केले. गाळेधारकांनी तीव्र विरोध केला असताना ६ अधिकारी, ६० कामगार, दोन जेसीबी यांच्या साहाय्याने हे गाळे पाडण्यात आल्याची माहिती जी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाने आता हा संपूर्ण परिसर बॅरिकेड्स लावून बंद केला आहे.

गाळेधारकांचे पुनर्वसन

गाळेधारकांना सीताराम जाधव मार्ग आणि गणपतराव कदम मार्गाच्या मध्यभागी असलेल्या त्रिशूळ इमारतीत जागा देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. येत्या ४५ दिवसांत या गाळेधारकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याची माहिती खामकर मंडईतील गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 1:44 am

Web Title: lower parel bridge demolished
Next Stories
1 वाघांच्या मृत्युनोंदीकडे दुर्लक्ष
2 महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजारपणातही निवडणुकीचे काम दिल्याचा आरोप
3 Viral Video चा दणका, मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसावर कारवाई
Just Now!
X