निशांत सरवणकर

नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प पुढे सरकत नसल्यामुळे चार महिन्यांपूर्वी माघार घेत असल्याचे पत्र देणाऱ्या ‘एल अँड टी’ने आता आपल्याला या प्रकल्पात रस असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पात अगोदरच साडेतीन वर्षे वाया गेल्यामुळे आणखी विलंब होऊ नये यासाठी पात्रता प्रक्रियेत कपात करण्याचा विचार म्हाडा करीत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाची नियुक्ती केली. या प्रकल्पांसाठी शापूरजी पालनजी (ना. म. जोशी मार्ग), टाटा समूह (वरळी) आणि ‘एल अँड टी’ (नायगाव) अशा बडय़ा कंपन्यांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हाडाचा हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यात खासगी विकासकाऐवजी म्हाडाला नफा मिळणार आहे. म्हाडाच्या बांधकामात पहिल्यांदाच मे. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचा विचार केलेला नाही. म्हाडाच्या आतापर्यंतच्या योजनेत रहिवाशांना पहिल्यांदाच ५०० चौरस फुटाचे घर मोफत मिळणार आहे. याशिवाय प्रकल्पात म्हाडाला विक्रीसाठी मिळणारी घरे मध्यम व उच्च वर्गासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

वरळी आणि ना. म. जोशी मार्ग येथील कामाला सुरुवात झाली. परंतु नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही. रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे गेले साडेतीन वर्षे काम सुरू न झाल्यामुळे ‘एल अँड टी’ कंपनीने या प्रकल्पातून माघार घेत असल्याचे पत्र दिले होते. त्यानंतर म्हाडाने ‘एल अँड टी’ची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ‘एल अँड टी’ने माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत झालेल्या खर्चापोटी म्हाडाकडे ६२ कोटींची नुकसानभरपाईही मागितली.

दरम्यान, ‘एल अँड टी’ला विनंती करणारे आणखी एक पत्र म्हाडाने पाठविले. त्यानंतर या प्रकल्पात रस असल्याचे पत्र ‘एल अँड टी’ने दिल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले. या प्रकल्पातून माघार घेण्याबाबतचे पत्रही ‘एल अँड टी’ने परत घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत ‘एल अँड टी’च्या या प्रकल्पाचे प्रवक्ते अमित विश्वास यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘एल अँड टी’ने चार महिन्यांपूर्वी या प्रकल्पातून माघार घेत असल्याचे पत्र दिले होते. त्यानंतर दोन-तीन बैठका घेऊन ‘एल अँड टी’चे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी म्हाडाने अलीकडे पुन्हा पत्रव्यवहार केला. त्यानंतर ‘एल अँड टी’ने प्रकल्पात पुन्हा रस दाखविला आहे. हा प्रकल्प सद्य:स्थितीत लगेच सुरू होणे अशक्य असल्यामुळे पात्रता प्रक्रियेत कपात करता येईल का, याचा विचार करीत आहोत.

– योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण मंडळ