एक-दोन किलोमीटर अंतरासाठी ४०० ते ५०० रुपये भाडे

मुंबईतील महत्त्वाच्या टर्मिनसपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षाचालक प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे उकळत आहेत. एक ते दोन किलोमीटरसाठी ४०० ते ५०० रुपये भाडे आकारण्यात येत आहे. तक्रारी केल्यानंतरही वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नसल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसमधून विविध राज्यांमध्ये दररोज २५ ते ३० गाडय़ांची ये-जा सुरू असते. त्यामुळे  प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. काही रिक्षाचालक गाडी स्थानकात दाखल होताच भाडे मिळविण्यासाठी थेट टर्मिनसमध्ये प्रवेश करतात. नवख्या प्रवाशांना गाठून जबरदस्ती रिक्षात बसवतात आणि दोन ते पाच किलोमीटरसाठी ४०० ते ५०० रुपये उकळतात, अशा तक्रारी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षाचालक प्रवाशांना अशाच प्रकारे लुटत आहेत. विरोध करणाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत रिक्षाचालकांची मजल गेल्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे तक्रारदार हैराण झाले आहेत. रेल्वे हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी आरपीएफवर आहे. काही प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर फलाटावर येऊन प्रवाशांना अडवणाऱ्या १००पेक्षा अधिक रिक्षाचालकांवर आरपीएफ जवानांनी दंडात्मक कारवाई केली होती. मात्र त्यानंतरही घुसखोरी सुरूच आहे.

सध्या हे रिक्षाचालक फलाट तिकीट काढून आत येत असल्याची माहिती आरपीएफमधील कर्मचाऱ्याने दिली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मुजोर रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी आमच्याकडे या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आम्ही मोठय़ा प्रमाणावर कारवाई केली होती. पुन्हा असा प्रकार या ठिकाणी घडल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-वेंकट पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.