मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीचा बोजवारा
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या लुफ्तान्झा कंपनीच्या विमानाचे चार टायर नादुरुस्त झाल्याने हे विमान शुक्रवारी रात्री धावपट्टीवर अडकले. शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत या विमानातील बिघाड दुरुस्त करण्यात यश न आल्याने मुंबईहून निघणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या अनेक कंपन्यांच्या अनेक विमानांचे वेळापत्रक कोलमडले. दरम्यान, विमानतळावरील पर्यायी धावपट्टीचा वापर करण्यात आला असला, तरी प्रवाशांची गैरसोय झाली.
म्युनिचहून मुंबईला येणारे एलएच-७६४ हे विमान शुक्रवारी १०.५० वाजता मुंबई विमानतळावर उतरले. मात्र या विमानाच्या चार चाकांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे हे विमान २७ क्रमांकाच्या मुख्य धावपट्टीवर अडकले. परिणामी या मुख्य धावपट्टीवरून विमानांची वाहतूक होणे बंद झाले. विमानातील १६३ प्रवाशांना विमानतळांवरील शिडय़ांच्या साहाय्याने मुख्य धावपट्टीवरच उतरावे लागले. मात्र यामुळे शनिवारी मुंबईहून सुटणारे या कंपनीचे विमान रद्द करावे लागले. ही चाके बदलल्यानंतर विमान बाजूला घेतले जाईल, असे लुफ्तान्झा या विमान कंपनीने स्पष्ट केले.
शुक्रवारी रात्री झालेल्या या बिघाडावर शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत काहीच तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे हे विमान मुख्य धावपट्टीवरच अडकून पडले होते. त्यामुळे एमिरॅट्स, युनायटेड एअरलाइन्स, सिंगापूर एअरलाइन्स अशा सर्वच विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर आणि वाहतुकीवर परिणाम झाला.
अनेक कंपन्यांना आपले विमान रद्द करून प्रवाशांची सोय जवळच्या हॉटेलमध्ये अथवा दुसऱ्या विमानांत करावी लागली. तर अनेक कंपन्यांनी आपल्या नेहमीच्या विमानांऐवजी छोटय़ा विमानांच्या साहाय्याने उड्डाण करणे पसंत केले. त्यामुळे काही कंपन्यांनी आपल्या एअरबस विमानांऐवजी बोइंग-७७७ आदी विमानांनी वाहतूक केली.
या बिघाडाचा फटका पाच हजारांहून अधिक प्रवाशांना बसला. त्यामुळे विमानतळावरही गोंधळाचे वातावरण होते.
हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी लुफ्तान्झाच्या बिघडलेल्या विमानाचा लँडिंग गिअर बदलण्याचे काम शनिवारी संध्याकाळी उशिरा चालू असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली. मात्र हे विमान धावपट्टीवरून कधी बाजूला घेतले जाईल, दिवसभरात किती विमाने रद्द झाली, किती उशिरा सुटली वा उतरली, याची माहिती मिळू शकली नाही.