कडक तपासणीमुळे प्रवाशांची रखडपट्टी; अन्य प्रवेशमार्गाकडे दुर्लक्ष

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चर्चगेट स्थानकात बॅगेज स्कॅनर मशीन (सामान तपासणी यंत्रणा) कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु केवळ संशयित व्यक्तीच्या सामानाची तपासणी करण्याऐवजी स्थानकात येणाऱ्या बहुतेक सर्वच प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. त्यामुळे घाईत असणाऱ्या व स्थानकात लोकल पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानकात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग असल्यामुळे तेथील सुरक्षेचे काय, असा सवालही उपस्थित होत आहे.

चर्चगेट स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील सुरुवातीचे स्थानकही आहे. नरिमन पॉईंट, फोर्ट परिसरात मोठय़ा प्रमाणात असणारी सरकारी, खासगी कार्यालये, महाविद्यालये, पर्यटन स्थळ, खरेदीची ठिकाणे पाहता स्थानकात प्रवाशांची संख्या जास्त असते. दिवसभरात येथून ९६ हजार प्रवासी ये-जा करतात.

चर्चगेट स्थानकाचे महत्त्व लक्षात घेता येथे रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांकडे असणाऱ्या सामानाची तपासणी करणारी यंत्रणा येथे नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने सामानाची तपासणी करण्यासाठी बॅगेज स्कॅनर मशीन बसविले आहे. मात्र संशयित व्यक्तीच्या बॅगेची तपासणी करण्याऐवजी स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडील सामानाची व वस्तूंची तपासणी केली जात आहे. चर्चगेट स्थानकात असणाऱ्या तिकीट खिडक्यांच्या परिसरात फलाट क्रमांक एक जवळ इंडिकेटरच्या खालीच व डोअर मेटल डिटेक्टरच्या बाजूलाच स्कॅनर बसविण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानाकडून हे यंत्र हाताळले जाते. त्याच्या बाजूलाच महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान तैनात केला असून त्याच्याकडून प्रवाशांना बॅग तपासणीसाठी यंत्रात ठेवण्याची सूचना केली जाते.

स्कॅनर मशीनच्या बाजूलाच पाच ते सहा डोअर मेटल डिटेक्टरही आहेत. इंडिकेटरखालील डोअर मेटल डिटेक्टरमधून प्रवासी जात असल्यास त्यांना बोलावून स्कॅनर मशीनमध्ये बॅग ठेवण्यास सांगितले जाते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

चर्चगेट हे महत्त्वाचे व गर्दीचे स्थानक आहे. येथे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी बॅगेज स्कॅनर मशीन नव्हते. त्यामुळेच ते लावण्यात आले आहे.

– अनुप कुमार शुक्ला, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्कॅनर बसविण्यात आले ही चांगली बाब आहे. मात्र संशयित व्यक्तींऐवजी सर्वच प्रवाशांकडील सामानाची तपासणी केली जात आहे. त्यामुळे लोकल पकडण्यास विलंब होतो.

– अक्षय कदम, प्रवासी