रेल्वेतील प्रवाशांची सुरक्षा हा जिकीरीचा मुद्दा असून त्यासाठी विविध स्तरातून सहकार्य घेण्यासाठी रेल्वे पोलीस प्रयत्न करत असतात. आता रेल्वे पोलीस मुंबईकर प्रवाशांच्या सरुक्षेसाठी चक्क डबेवाल्यांची मदत घेणार आहेत.
प्रवासादरम्यान आढळणाऱ्या संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींची पोलिसांना तातडीने माहिती देण्याचे आवाहन रेल्वे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी शनिवारी डबेवाल्यांना केले. रेल्वे पोलीस आयुक्तालयातर्फे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये पोलीस मित्र परिसंवाद आयोजित केला होता. त्यात, मुंबईतील डबेवाल्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. लोकल, मुंबईकर, डबेवाले यांचा एकमेकांशी अनन्य संबंध असतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशन, लोकल वा परिसरात कोणत्याही संशयास्पद वस्तूंचा त्यांना लागलीच मागोवा लागू शकतो. त्यामुळेच भविष्यात दुर्घटना टाळण्याचा मार्ग मिळू शकतो. त्यामुळे सुमारे पाच हजार डबेवाल्यांनी मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सजग होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा’चे सल्लागार सोपान मरे, सुभाष तळेकर, उपायुक्त रुपाली अंबुरे, उपायुक्त दीपक देवराज आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वे पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातर्फे सादरीकरण झाले.