मुंबईतील रस्त्यांची कामे, वाहने-कारखान्यांमधून निघणारे घातक वायू यांमुळे धोका वाढला

सतत सुरू असणारी रस्त्याची दुरूस्तीची कामे, वाहनांमधून आणि कारखान्यांमधून निघणारे घातक वायू यांमुळे मुंबईत प्रदुषणाची पातळी वाढत असून यामुळे केवळ श्वासाचेच आजार नव्हे तर क्षयरोग आणि फुप्फुसाच्या कर्करोगाचाही धोका संभवतो आहे.

[jwplayer izOWW4O7]

वातावरणातील प्रदुषण हे कर्करोग होण्यास कारणीभूत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी काढलेल्या यादीमध्ये नमूद केले आहे. शहरांमध्ये वेगवेगळ्या घटकांमुळे वाढणाऱ्या प्रदुषणाचा परिणाम रुग्णांमध्ये दिसत आहे. यंदाच्या वर्षी एशियन कॅन्सर इन्स्टिटय़ुटमधील ४०० रुग्ण हे मुंबई शहरातील असून यातील २०० रुग्णांना धुम्रपान किंवा कुठलेही व्यसन नसताना फुप्फुसाचा कर्करोग झाला असल्याचे निदर्शनास आले. प्रदुषणाचा परिणाम हा श्वसन प्रक्रियेतून थेट फुप्फुसावर होत असतो. फुप्फुसांमुळे होणारा क्षय या विकाराचे उच्चाटन होण्यास अवधी लागतो. क्षयरुग्णांना बरे होण्यासाठी शुद्ध हवेची गरज असते. मात्र आपल्याकडे वातावरणामुळे होणाऱ्या मानवहानीकडे दुर्लक्ष केले जात नाही, असे ‘एशियन कॅन्सर इन्स्टिटय़ुट’चे डॉ. रमाकांत देशपांडे यांनी सांगितले.

फुप्फुसाचा कर्करोग आणि क्षयरोग झालेल्या रुग्णाचा आजार बरा होण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे हे आजार बळावत जातात. गेल्या अनेक महिन्यात आमच्याकडे फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले असून दमा, खोकला, संसर्ग अशा रुग्णांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे, असे ‘आशा कॅन्सर रुग्णालया’चे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सतीश कामत यांनी सांगितले. प्रदुषणाच्या परिणामामुळे रुग्णांना सर्दी, खोकला, घशाचा संसर्ग, दमा असे आजार दिसत असून याचा परिणाम नागरिकांच्या कार्यक्षमतेवरही होत आहे. लहान मुलांवर याचा परिणाम अधिक होत असून शाळेच्या सुट्टय़ा होणे, अभ्यास करण्यास कंटाळा येणे अशी लक्षणे दिसतात, असेही डॉ. कामत यांनी सांगितले. हवेच्या प्रदुषणात धुम्रपान, कंपन्या  त्याचबरोबर रस्त्यांवरील बांधकाम हे कारणही जबाबदार आहे. आपल्याकडे वर्षभर रस्त्यांची कामे सुरु असतात, यातून निघणाऱ्या धुळीचे कण श्वासावाटे शरीरात जातात आणि यातूनच श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. अनेकदा आम्ही रुग्णांना तोंडाला मास्क लावण्याचा सल्ला देतो. मात्र हा पर्याय क्षयरोगांशी संबंधित असल्यामुळे सामान्य रूग्ण मास्क लावणे टाळतात, असे ठाणे येथील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. मनोज मस्के यांनी सांगितले.

[jwplayer OnydZc5l]