मुंबईत चार नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम

न्यायालयाच्या निर्णयापलीकडे जाऊन प्रथमच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून मुंबईतील पंचतारांकित धर्मादाय रुग्णालये थेट रस्त्यावरील भिकाऱ्यांसह गोरगरीबाची तसेच झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन गरीब रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत. या तपासणीत ज्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक असेल त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखलही केले जाणार आहे. येत्या चार नोव्हेंबर रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला आली आहे.

मुंबईतील पंचतारांकित धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांना दहा टक्के राखीव जागाअंतर्गत उपचार करत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत असतात. धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्याकडे असलेल्या खाटांपैकी दहा टक्के खाटा गरीब रुग्णांवर मोफत उपचारासाठी राखीव ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचे पालन व्हावे यासाठी रुग्णालयांच्या प्रवेशद्वाजवळ स्पष्ट दिसेल अशा प्रकारे या योजनेची माहिती फलक लावणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानंतरही काही मोठय़ा रुग्णालयाकडून गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, हिंदुजासह ७६ मोठी धर्मादाय रुग्णालये येत्या चार नोव्हेंबर रोजी मुंबईतील रस्त्यावरील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे. तसेच यातील गंभीर आजारी रुग्णांना थेट आपल्या रुग्णालयात दाखलही करणार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या झोपडपट्टय़ांमध्ये जाऊनही आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मुंबईचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांच्या संघटनेबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एक दिवसासाठी रस्त्यावरील गरीब रुग्णांच्या आरोग्याची तपासणी व उपचार तसेच झोपडपट्टीमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. याबाबत शिवकुमार डिगे यांना विचारले असता ते म्हणाले, पहिल्याच बैठकीत बहुतेक रुग्णालयांच्या प्रमुखांनी ही संकल्पना उचलून धरली. यानंतर अंमलबजावणीसाठी आणखी दोन बैठका झाल्या. या बैठकांना मुंबईतील जवळपास सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिकारी उपस्थित होते. शंभर खाटांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या रुग्णालयांनी प्रत्येकी दोन रुग्णवाहिका, डॉक्टर तसेच आवश्यक त्या चाचण्या करण्यासाठी उपकरणे घेऊन चार नोव्हेंबर रोजी मुंबईतील रस्त्यांवरील गरीबांच्या आरोग्याची तपासणी करायचे निश्चित झाले. त्याचप्रमाणे शंभर खाटांपेक्षा कमी क्षमता असलेली रुग्णालये एक रुग्णवाहिका, डॉक्टर व उपकरणे घेऊन तपासणी करतील.

’ मुंबईत एकूण ७६ धर्मादाय रुग्णालये असून त्यात गरीब रुग्णांसाठी सुमारे १७०० खाटा राखीव आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर, पदपथांवर हजारो भिकारी दयनीय अवस्थेत जगत असतात. शेकडो गरीब मुले सिग्नलवर भिक मागत असतात. त्यातील अनेक वृद्धांच्या आरोग्याची समस्या जाता येता दिसत असते. या रस्त्यावरच्या गरीबांनी कधी शासकीय अथवा पालिका रुग्णालयातही पाऊल ठेवले की नाही कोण जाणे, तथापि या गरीबांनाही उपचार मिळाले पाहिजे अशी भूमिका धर्मादाय रुग्णालयांच्या प्रमुखांच्या बैठकीत मी मांडली. त्यांनी ती स्वाकारल्यामुळे येत्या गुरुनानक जयंतीदिनी दिवसभर मुंबईतील पदपथांवरील गरीब रुग्णांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. आमचेही अधिकारी या कामात रुग्णालयांना मदत करतील, असेही शिवकुमार डिगे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ही योजना मुंबईत राबवत असून त्यानंतर राज्यातील ४३७ धर्मादाय रुग्णालयांच्या सहकार्याने राज्यस्तरावरही राबविण्याचा मानस डिगे यांनी व्यक्त केला.