षण्मुखानंद सभागृहात उदयोन्मुख कलाकारांचा गौरव

कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात २८ सप्टेंबरला गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देशभरातून एकूण ५० तरुण आणि होतकरू वादक-संगीतकारांना संगीतविषयक शिष्यवृत्ती बहाल केली जाणार आहे. यात प्रत्येक सत्कारमूर्तीला पुढील तीन वर्षांसाठी प्रतिवर्षी एक लाख याप्रमाणे रोख रक्कम दिली जाणार आहे. १८ शहरांतील कर्नाटक कंठसंगीत, व्हायोलिन, बासरी, नादस्वरम, मृदंग, सरोद, वीणा आणि हिंदुस्थानी कंठसंगीत अशा १३ क्षेत्रांतील एकूण १०३ तरुण कलाकारांना सभेने आजवर ही शिष्यवृत्ती बहाल केली आहे.

भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. राज्यपाल विद्यासागर राव हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष मान्यवर अतिथी असतील. या प्रसंगी चेन्नईतील ‘तारांहिनी स्कूल ऑफ डान्स’चे विद्यार्थी ‘मैत्री भजत’ या प्रसिद्ध रचनेवर नृत्य सादर करतील. सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल.

यंदाच्या सत्कारमूर्तीत आठ वर्षांचा अनिर्बान रॉय (बासरी), ११ वर्षांचा राहुल वेल्लाळ (कंठसंगीत) यांचा समावेश आहे. या वेळी प्रथमच हिंदुस्थानी व्हायोलीन या क्षेत्रातील १८ वर्षांचा यज्ञेश मिलिंद रायकर आणि हिंदुस्थानी कंठसंगीतातील १५ वर्षीय दानिश खान अल्ताफ यांचाही समावेश आहे. या शिष्यवृत्तीची सुरुवात २०१३ मध्ये डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आली.