ठरावीक कंपनीला डोळ्यांसमोर ठेवून नियमांची आखणी केल्याचा आरोप

नालेसफाई, रस्ते, वाहनतळापाठोपाठ आता अग्निशमन दलामध्ये यंत्रसामग्रीच्या खरेदीमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. निविदा प्रक्रियेमध्ये ठरावीक कंपनीला डोळ्यांसमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली असून त्यामुळे निविदा प्रक्रियेत स्पर्धाच होऊ शकली नाही. परिणामी, एकाच कंपनीवर मेहेरनजर झाल्यामुळे त्यात पालिकेचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आहेत. जुन्या चाळींच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहू लागले आहेत. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाला उंच शिडय़ांची गरज भासू लागली आहे. अग्निशमन दल सुसज्ज करण्याच्या दृष्टीने आणि टॉवरमध्ये दुर्घटना घडल्यास जलदगतीने मदतकार्य करणे शक्य व्हावे यासाठी उंच शिडय़ा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एकाच कंपनीला डोळ्यांसमोर ठेवून निविदांचे नियम ठरविण्यात आले आणि त्यानुसार शिडय़ांची खरेदी करण्यात आली. परिणामी, अशा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून विशिष्ट कंपन्यांकडून अग्निशमन दलासाठी यंत्रसामग्री खरेदी करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत, असे एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

अग्निशमन दलासाठी आतापर्यंत १७ क्विक रिस्पॉन्स मल्टिपर्पज व्हेइकल, ९० मीटर उंच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, ८१ मीटर उंच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, आरएफपी हॅजमेन्ट वाहन व ६८ मीटरच्या तीन टर्न टेबल लॅडर आदी यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. मात्र ही यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी ठरावीक कंपन्यांना डोळ्यांसमोर ठेवून नियम तयार करण्यात आले होते. त्यामुळे अन्य कंपन्या पात्र ठरू शकल्या नाहीत आणि अखेर मर्जीतील कंपन्यांकडून ही यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली, असा आरोप या अधिकाऱ्याने केला आहे. हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म आणि टर्न टेबल लॅडर खरेदीमध्ये ठरावीक कंपन्यांवर मेहेरनजर करण्यात आली आहे. ब्रान्टो आणि मॅगोरस या दोन कंपन्यांनाच त्यासाठी पसंती देण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

वेगवेगळ्या उंचीच्या शिडय़ा बनविणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या ठरावीक उंचीच्याच शिडय़ांची निर्मिती करतात. मात्र शिडय़ा खरेदीच्या निविदांमध्ये विशिष्ट उंचीच्या शिडीच्या अटीचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे या उंचीची शिडी बनविणाऱ्या कंपनीलाच निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले. परिणामी, अन्य कंपन्यांकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. अलीकडेच अग्निशमन दलाच्या ताफ्यात १६ बंब खरेदी करण्यात आले होते. मात्र त्यातून गळती होत असल्याचा प्रकार माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी उघडकीस आणले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या यंत्रसामग्री खरेदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.