मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी आम्ही दहशतवादी अजमल कसाबकडून ‘भारत माता की जय’ असं वदवून घेतलं होतं, असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केला आहे. मारिया यांनी लिहिलेल्या ‘लेट मी से इट इट’ हे आत्मचरित्रामध्ये यासंदर्भातील खुलासा केला आहे. सध्या मारियांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रचंड चर्चेत आहे. सोमवारी प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये मारिया यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अन् कसाब भारत माता की जय म्हणाला…

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबसंदर्भात मारिया यांनी आपल्या पुस्तकात अनेक खुलासे केले आहेत. हल्ल्यानंतर काही दिवसांनी पोलीस कसाबला मेट्रो जंक्शन परिसरात घेऊन गेले होते. याच परिसरामध्ये कसाबने पोलिसांवर केलेल्या गोळीबारामध्ये काही पोलीस अधिकारी शहीद झाले होते. कसाबला तिथे घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ‘भारत माता की जय’ बोलण्यास सांगितल्याचा दावा पुस्तकात मारिया यांनी केला आहे.

“पोलिसांचा ताफा मेट्रो जंक्शन परिसरामध्ये दाखल झाला. काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये कसाबने गोळीबार करुन माझ्या प्रिय सहकाऱ्यांना आणि निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. “खाली वाक आणि कपाळ जमीनीला लाव”, असा आदेश मी कसाबला दिला. घाबरलेल्या कसाबने माझ्या आज्ञेचे पालन केले आणि तो कपाळ जमीनीला लावून खाली बसला. आता ‘भारत माता की जय’ असं मोठ्याने बोल असा आदेश मी त्याला दिला. तेव्हा कसाब ‘भारत माता की जय’ असं म्हणाला. त्याच्या तोंडून एकदा ‘भारत माता की जय’ ऐकून माझं समाधान न झाल्याने मी त्याला दोनवेळा पुन्हा म्हणण्यास सांगितलं,” असं मारिया यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

आणखी वाचा – २६/११ : ही आहेत पाकिस्तानी अतिरेक्यांची खोटी हिंदू नावे

त्याला मशिदीमध्ये घेऊन गेलो…

“भारतामधील मशिदींमध्ये मुसलमानांची हत्या केली जाते त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करु दिले जात नाही असं कसाबला वाटत असल्याने आम्ही त्याला मशीदीमध्ये घेऊन गेलो होते. आमच्या या कृतीमुळे कसाबला आश्चर्याचा धक्का बसला होता,” असा दावा मारिया यांनी केला आहे.