मढला वर्सोव्याशी जोडणाऱ्या फेरीबोटच्या तिकिटात १०० टक्के वाढ झाल्याने मढवासीय अस्वस्थ झाले आहेत. नागरिकांनी ही दरवाढ रद्द व्हावी यासाठी सह्य़ांची मोहीम हाती घेतली असून ही दरवाढ रद्द व्हावी यासाठी बंदर निरीक्षकांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. एकीकडे मढ ते वर्सोवा या पुलाचे भिजत घोंगडे पडले असताना तिकीटदर कुठल्याही परिस्थितीत वाढू देणार नाही, असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मढहून मुंबईकडे दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. एका अंदाजानुसार दिवसभरात ५० हजारांच्या आसपास नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यासाठी सर्व जण मढपासून वर्सोव्याकडे जाणाऱ्या फेरी बोटींचा वापर करतात. रहिवाशांना दोन रुपये, तर बाहेरच्या व्यक्तींना ३ रुपये तिकीट आकारले जाते. या फेरीबोटीमुळे मढहून मालाडला जाण्याचा १३ किलोमीटरचा वळसा वाचून अवघ्या ३ किलोमीटरमध्ये अंधेरी, वर्सोवा येथे पोहोचता येते. मात्र, ही फेरीबोट सेवा चालविणाऱ्या मच्छीमार सहकारी सोसायटी लि. वेसावा यांनी या सेवेचे तिकीट दर वाढविण्याची विनंती वर्सोवा बंदर निरीक्षकांकडे केली आहे. नवीन दरानुसार स्थानिक प्रवाशांना २ रुपयांऐवजी ४ रुपये, तर इतर प्रवाशांसाठी ३ रुपयांऐवजी ५ रुपये द्यावे लागणार आहेत. पावसाळ्यात तसेच समुद्राला उधाण आले की ही बोटसेवा बंद ठेवण्यात येते. तसेच, दाटीवाटीने अधिकाधिक प्रवाशांची ने-आण केली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवालाही धोका असतो, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. स्थानिकांच्या मदतीला काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनीही बंदर निरीक्षकांना तिकीटदर वाढवू नये यासाठी विनंती केली आहे. एकीकडे प्रवाशांना कुठलीही सेवा न देता प्रवाशांच्या खिशातून आणखी पैसे काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप मालाड काँग्रेस, ब्लॉक क्र. २९चे अध्यक्ष विक्रम कपूर यांनी केला. ही वाढ केवळ २ रुपयांचीच अशी वाटत असली तरी जिथे एकही पैसे खर्च करायची गरज नाही तिथे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना भरुदड सोसावा लागत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसतर्फे मढ परिसरात ही तिकीट दरवाढ रद्द व्हावी यासाठी सह्य़ांची मोहीम हाती घेण्यात आली होती.