विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना अचानक प्रसाद लाड यांच्या पदरात उमेदवारी पडल्याने भांडारी समर्थकांमध्ये नाराजी असली, तरी लाड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून भाजपच्या सुकाणू समितीने त्यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे मान्यतेसाठी पाठविले होते, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. भांडारी व शायना एन. सी. यांच्या बदलत्या भूमिकांमुळेच उमेदवारीवरील त्यांचा दावा दुबळा झाला, अशी चर्चा पक्षात सुरू आहे.

नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेच्या एका जागेसाठी डिसेंबरात होऊ घातलेल्या निवडणुकीत माधव भांडारी यांना उमेदवारी मिळावी अशी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांत भांडारी यांच्या समर्थनाचे माहोलही पक्षात उभे राहिले होते. मात्र, भांडारी यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेची नाराजी अडचणीची ठरू शकते हे ओळखून भांडारी यांच्याऐवजी शिवसेनेस मान्य होणारा लाड यांचा चेहरा उमेदवारीसाठी पुढे आणण्याचे भाजपने ठरविले. स्वत लाड यांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुरेशी मोर्चेबांधणी केली होती. लाड यांना उमेदवारी दिल्यामुळे विरोधी पक्षांचे संभाव्य एकत्रीकरण व शिवसेनेचा संभाव्य विरोध मोडून काढण्यातही मुख्यमंत्र्यांना यश आले, असे या सूत्रांचे मत आहे.

लाड हे भाजपचे उमेदवार असले तरी त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे मधुर संबंध पक्षाला सभागृहातील कामकाजात उपयुक्त ठरतील, ही त्यांच्या निवडीची जमेची बाजू असल्याचे या सूत्रांना वाटते.

माधव भांडारी आणि शायना एन.सी. यांना याआधी पक्षाने संधी देऊ केली होती, पण भांडारी यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती होती, तर शायना एन.सी. यांच्या लोकसभा उमेदवारीवर गेल्या वेळी पक्षाने शिक्कामोर्तबही केले होते. मात्र, नंतर भांडारी व शायना एन. सी. यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. शायना एन. सी. यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघात विधानसभेच्या क्षेत्रांत सहा कार्यालयेदेखील सुरू केली होती, पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली व त्या विजयी झाल्या.

विधानसभा किंवा लोकसभेत जाण्याची तयारी करतानाच विधान परिषदेसाठीही इच्छुक असल्याचे संकेत दिल्यामुळे त्यांचा दावा दुबळा झाला असावा अशी चर्चा आहे. भांडारी हे रा. स्व. संघाचे कार्यकर्ते असून पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांची प्रवक्तेपदाची कारकीर्दही चमकदार आहे. येत्या जूनमध्ये विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त होत असून त्यावेळी होणाऱ्या निवडणुकीत भांडारी यांना स्थान मिळेल या आशेने आता त्यांचे समर्थक जून महिन्याकडे डोळे लावून बसले आहेत.

राणे, सेना दोघेही खूश!

  • नारायण राणे यांची उमेदवारी आपल्या विरोधामुळेच हाणून पाडली गेली याबद्दल शिवसेनेच्या गोटात खुशीचे वातावरण असून राणे यांच्याऐवजी प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर करणे हा आपला विजय आहे असे शिवसेनेत बोलले जात आहे.
  • आपल्या पराभवासाठी जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची पाळी शिवसेनेवर येत असेल तर तो आपला विजय आहे, असा दावा करीत नारायण राणे यांनी सेनेची खिल्ली उडविली आहे.
  • या रिक्त जागेवर भाजपचाच दावा असल्याने मित्रपक्षांसाठी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लाड यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.