माधव भांडारी यांचे प्रत्युत्तर

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मराठा मोर्चा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप निखालस खोटा व राजकीय हेतूने प्रेरित आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश मिळणार असल्याचे दिसू लागल्यानंतर काही जणांनी वैफल्यापोटी हा आरोप केला आहे. भाजपने मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल पाठिंब्याची भूमिका घेतली असून राज्य सरकारनेही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत, असे भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे व आशीष शेलार यांच्यावर आंदोलनात फूट पाडण्याचा केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. भाजप हा आरोप स्पष्टपणे फेटाळत आहे. या आंदोलनात कोणतेही राजकारण आणू नये, अशी भाजपची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या समस्या ठामपणे मांडल्या गेल्या व भाजपने त्याची दखल घेतली. दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मराठा समाजाविषयीचा ठराव चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला व तो एकमताने मंजूर झाल्याचेही ते म्हणाले.