माधुरी पुरंदरेला बालसाहित्यातील तिच्या कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्काराने आश्चर्यचकित होण्यासारखं काही आहे, असं मला वाटत नाही. असे अनेक पुरस्कार तिला यापूर्वीच मिळायला हवे होते. श्री. ना. पेंडसे एकदा म्हणाले होते, की लेखक आणि कलावंतानं प्रत्येक गोष्ट जीव ओतून करायची असते. तिचं स्वागत कसं होईल, याची काळजी करायची नसते. तसं आणि त्या दर्जाचं काम हातून झालं, तर त्या कलाकृतीपर्यंत पुरस्कारांनाच फरफटत यावं लागतं. माधुरीच्या बाबत नेमकं असंच घडलं आहे.
माधुरी पुरंदरे यांना ‘साहित्य अकादमी’
माधुरी सहा-सात वर्षांची असेल. तिचा वाढदिवस मला अजूनही स्पष्ट आठवतोय. गुलाबी फ्रॉकमधल्या माधुरीनं तिच्या मैत्रिणींबरोबर त्या दिवशी एका गाण्यावर नृत्य केलं होतं. त्या वयातही तिला त्या गाण्याच्या अर्थाची चांगली समज असल्याचं जाणवत होतं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, हालचाली इतरांपेक्षा वेगळय़ा जाणवत होत्या. तेव्हा शाळकरी असलेल्या मलाही हे सगळं लक्षात येत होतं. वयाच्या तारुण्यात माधुरीनं हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या एका ऑर्केस्ट्रामध्ये भाग घेतला होता. तिच्या वाटय़ाला पाच-सहा गाणी आली होती. ‘अनारकली’ चित्रपटातलं ‘ये जिंदगी उसी की है’ हे लता मंगेशकरांचं गाणं तिनं अप्रतिमरीत्या सादर केलं होतं. सगळय़ांनी तिची तेव्हा खूप स्तुतीही केली होती. दोनतीन दिवसांनी मला भेटली, तेव्हा तो ऑर्केस्ट्रा आपण सोडून दिल्याचं तिनं सांगितलं. मी म्हटलं, सगळय़ात चांगलं गाणं तुझंच होतं.. तर म्हणाली, ‘कार्यक्रमाच्या मध्यंतरात आणि नंतर जो तो डिक्टो लताबाईंसारखं गातेस,
असं म्हणत होता.’ माधुरी
त्यानंतर जे बोलली, ते माझ्या कायम स्मरणात राहिलंय. ती म्हणाली, ‘जर लता-आशा यांच्यासारखंच गायचं असेल, तर माझी गरजच काय? मी माधुरी पुरंदरे आहे. मला माझं गाणं गाता आलं, तरंच मी गाईन.’  माधुरी गाण्याच्या क्षेत्रात पूर्णवेळ उतरली असती, तर तिनं तिथंही मळलेली वाट सोडून स्वत:ची हरिण वाट शोधली असतीच. नंतरच्या काळात ‘अमृतगाथा’सारख्या कार्यक्रमात तिला तिचं गाणं गाता आलं. तो कार्यक्रम ऐकल्यानंतर एकदा भीमसेन जोशी मला म्हणाले होते, ‘त्या मुलीच्या आवाजाची जातकुळी फार सुरेख आहे.’ ‘तीन पैशाचा तमाशा’मधील तिनं गायलेली गज़्‍ाल आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तिची भूमिका पराकोटीची उत्तम होती. काही कारणानं तिनं नाटक सोडलं, तेव्हा पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘या मुलीनं माझं नाटक बंद पाडलं.’
लेखक म्हणून माधुरीनं व्हॅनगॉगच्या ‘लस्ट फॉर लाईफ’ या चरित्राचा अनुवाद पहिल्यांदा केला. माझ्या हाती हस्तलिखित आलं, तेव्हा मला तिचं सुंदर मराठी जसं लक्षात आलं, तसंच लेखनाच्या गाभ्यापर्यंत जाण्याची तिची धडपडही जाणवली. तिचं हे पुस्तक माझ्याकडून वाचकांपर्यंत हवं तसं पोचवलं गेलं नाही, ही एक खंत वाटते. पण लेखक म्हणून तिची वेगळी ताकद त्याच वेळी सिद्ध झाली होती. बालसाहित्याच्या क्षेत्रात तिनं केलेली कामगिरी खरोखरच महत्त्वाची मानायला हवी. विषय सोपा करून समजावून सांगण्याची तिची हातोटी तिच्या सगळय़ाच लेखनात दिसते. बालसाहित्यात तर ती अधिकच उठून दिसते. तिला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार ही तिच्या कामगिरीवर उमटलेली मोहर आहे, असं मला वाटतं.