महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या ४० हजार कोटी डॉलरची असून २०३० पर्यंत ती एक लाख कोटी डॉलपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. मात्र २०२५ पर्यंत महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठरवल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठीचा पंचसूत्री कार्यक्रम रविवारी मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूकदारांच्या परिषदेत जाहीर केला.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ या गुंतवणूकदारांच्या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा, रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, महिंद्राचे आनंद महिंद्र, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, गोदरेज समूहाचे आदी गोदरेज, व्हर्जिन समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन, वेदांत समूहाचे अनिल अगरवाल आदी देश-विदेशातील नामांकित उद्योजक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांना भगवी पैठणी शाल देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

भारताचा समावेश पाच लाख डॉलरच्या अर्थव्यवस्थेत होणार असा जागतिक अर्थविश्वाचा अंदाज आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या ४० हजार कोटी डॉलरची असून २०३० पर्यंत ती एक लाख कोटी डॉलपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. देशाच्या आर्थिक ध्येयात सहभागी होण्याचे व त्यात वाटा उचलण्याचे महाराष्ट्राने ठरवले असून महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिले राज्य करण्याचा संकल्प केला आहे. राज्याचा विकासदर सध्या ९.३ टक्के असून उद्योग क्षेत्राचा विकास १२ टक्क्यांनी तर सेवा क्षेत्राचा विकास १५ टक्क्यांनी होत आहे. राज्याचा वेगाने विकास करण्याचे व २०२५ मध्येच महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. २०१६ मधील मेक इन महाराष्ट्र परिषदेत आठ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. त्यापैकी ६१ टक्के प्रत्यक्षात येत आहेत. ७२ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले असून १.६६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांत आहेत, असा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी मांडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ईझ ऑफ बिझनेसचा मंत्र लक्षात घेऊन राज्य सरकारने सत्तेवर आल्यावर गेल्या तीन वर्षांत बऱ्याच सुधारणा केल्या असून त्याचा परिणाम म्हणून  महाराष्ट्र परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. सब का साथ सब का विकास हे लक्ष्य महाराष्ट्राने ठेवले आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

पंचसूत्री कार्यक्रम

  • उच्च विकासदर असणाऱ्या डेटामाइनिंग, कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला चालना.
  • कृषीक्षेत्रातील मजुरांच्या क्षमतांचा विकास. त्यांना व ग्रामीण भागातील मजुरांना कौशल्यविकास प्रशिक्षण.
  • धोरणात्मक सुधारणांचा वेग वाढवणे. फिनटेक धोरणासारख्या नावीन्यपूर्ण धोरणांमधून तीन वर्षांत ३०० स्टार्टअप.
  • सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यासाठी वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा विकास.
  • समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांमधून उर्वरित महाराष्ट्रातील विकासाच्या केंद्रांना बंदरे, मुंबई महानगराशी जोडणार.