मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)अटक केलेल्या चार आरोपींनी वर्षभरापासून शस्त्र, स्फोटकांच्या साठय़ाची जमवाजमव केली. त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेर अतिरेकी कारवायांचे आणि घातपाताचे प्रशिक्षण घेतले.

आरोपींनी महाराष्ट्र, गोव्याबरोबरच अन्य राज्यांमध्येही भटकंती केली. या भटकंतीदरम्यान त्यांनी अन्य राज्यांमधील काही ठिकाणांची पाहणीही केली, अशी माहिती आतापर्यंतच्या चौकशीतून उजेडात आली आहे. या माहितीची खातरजमा करण्यात येत आहे.

नालासोपारा, पुणे आणि जालना येथून एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर या चौघांना अटक केली. तर नालासोपारा आणि सोलापूर येथून शस्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. त्यात २० गावठी बॉम्ब, देशी बनावटीची पिस्तूल, पिस्तूल बांधणीसाठीचे सुटे भाग, काडतुसे आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे.

चारही आरोपी प्रशिक्षित, मनाने कठोर आणि चौकशीदरम्यान दिशाभूल करण्यात सराईत आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून उजेडात आलेल्या माहितीची जुळवाजूळव करून सापडलेला शस्त्रसाठा, गावठी बॉम्ब आणि त्यांच्या संभाव्य वापराची ठिकाणे कोणती, कट शिजवण्याची ठिकाणे कोणती याचा तपास एटीएस करीत आहे. बॉम्ब बनवणे किंवा सुटे भाग जुळवून शस्त्र बांधण्याचे प्रशिक्षण आरोपींनी इंटरनेटद्वारे घेतल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित अतिरेक्यांच्या कटाचे स्वरूप काय होते, हे पुरते स्पष्ट झालेले नाही. पांगारकर सहा वर्षांपासून अन्य आरोपींच्या संपर्कात होता आणि त्यांना पैसा पुरवत होता. त्याच्यासह सर्व आरोपींचे या काळातील आर्थिक व्यवहारही तपासले जाणार आहेत. या आरोपींचा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध आहे का, याबाबत माहिती देण्यास एटीएसने नकार दिला. मात्र चारही आरोपींचा उद्देश एकच होता. कटाची अंमलबजावणी करण्यासाठी ते स्वतंत्रपणे काम करत होते. प्रत्येकावर स्वतंत्र जबाबदारी होती. त्यामुळे सहआरोपींचे साथीदार, त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरूप ही महत्वाची माहिती आरोपींकडून मिळवण्यात अडचणी येत आहेत. आरोपींकडून सूत्रधारांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हस्तगत केलेली शस्त्रे आणि स्फोटकांच्या स्त्रोताची नेमकी माहिती एटीएसला मिळाली आहे. परराज्यातून हा शस्त्रसाठा आरोपींनी नालासोपारा, सोलापूर येथे आणला. आरोपी ते पुरवठादार या साखळीचा माग एटीएस काढत आहे.

.. तर डॉ. आठवलेंचीही चौकशी

आवश्यकता भासली तर सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांचीही चौकशी केली जाईल, असे एटीएसने स्पष्ट केले आहे. सनातनच्या बंदीबाबतचा अहवाल याआधी एटीएसने पाठवला होता. शासनाने मागणी केल्यास अहवाल पाठवला जाईल. गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल प्रत्येक गुन्हयाची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला २४ तासांच्या आत कळवली जाते. तशी ती कळवल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या प्रत्येक तपास यंत्रणेशी समन्वय आहे. गरज पडल्यास आरोपींचा ताबाही घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.