महाराष्ट्र सरकारने आधारकार्डशी निगडित इ लॉकर तयार केला असून त्याच्या मदतीने  शिक्षण व मालमत्ता प्रमाणपत्र त्या लॉकरमध्ये अपलोड करता येतील व हवी तेव्हा त्यांच्या प्रती मिळू शकणार आहेत. ही ऑनलाइन पेढी असून त्यात महत्त्वाची प्रमाणपत्रे, पदवी प्रमाणपत्रे व इतर सेवा मिळतील. महाडिजिटल लॉकर असे त्याचे नाव असून त्यामुळे लोकांच्या हालअपेष्टा संपण्याची आशा आहे. यात तुम्ही ज्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे ते थेट तुमच्या इ लॉकरवर संबंधित सरकारी विभागाच्या वतीनेही अपलोड केले जाईल त्यामुळे कागदपत्रांसाठी वणवण करावी लागणार नाही व चिरिमिरीही द्यावी लागणार नाही. महाराष्ट्र राज्य इ प्रशासनात प्रगती करीत आहे व केंद्र सरकारनेही या कामाचे कौतुक केले आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक वीरेंद्र सिंग यांनी सांगितले. महाडिजिटल लॉकर या कार्यक्रमाविषयी त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे ते इ लॉकर सुविधा वापरू शकतील व इ लॉकर डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या पत्त्यावर लॉग इन करू शकतील. आधार कार्ड क्रमांक हा त्यात मूळ असेल व त्याच्या मदतीने त्या व्यक्तीचे खाते उघडता येईल. ती व्यक्ती तिची महत्त्वाची कागदपत्रे त्यात अपलोड करू शकेल व हवे तेव्हा काढू शकेल अशी ही सुविधा आहे. जन्म, विवाह, उत्पन्न व जातीची प्रमाणपत्रे इ लॉकरवर ठेवता येतील त्यामुळे ती प्रत्यक्ष घेऊन प्रत्येक ठिकाणी जावे लागणार नाही. नियोक्ते आमच्याकडे सायनिंग अप करून थेट उमेदवाराची कागदपत्रे बघू शकतील पण त्यात त्यांना फेरफार करता येणार नाही. तिसऱ्याच व्यक्तीला ही कागदपत्रे दिसणार किंवा मिळणार नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती सेतू कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी अर्ज करील तेव्हा त्या व्यक्तीच्या खात्यावर प्रमाणपत्र ग्रामपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अपलोड करील. इ लॉकरच्या सुरक्षिततेविषयी सिंग यांनी सांगितले की, त्याचा गैरवापर करता येणार नाही कारण वन टाइम पासवर्ड व्यक्तीच्या मोबाईलवर पाठवला जाईल व प्रत्येकवेळी त्याला आधारकार्ड क्रमांक द्यावा लागेल. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक पातळीवर असून वर्धा जिल्ह्य़ात चालू आहे, तेथे आधारकार्डाचे काम १०० टक्के झाले आहे. आधार कार्डाचे काम पूर्ण झाले तर संपूर्ण राज्यात ही योजना राबवता येईल. आधारकार्डचे ९५ टक्के काम झाले आहे.