भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान एका तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सोमवारी पुण्यातील भीमा कोरेगाव भागात असलेल्या शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आंबेडकरी अनुयायी वर्षाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी आले होते. या शौर्य स्तंभाचे यंदाचे २०० वे वर्ष आहे त्यामुळे या कार्यक्रमाला खास महत्त्व होते. मात्र किरकोळ कारणावरून या ठिकाणी हिंसाचार उसळला आणि त्याचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. याच हिंसाचारात एका तरूणाचा मृत्यू झाला. या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने संदर्भातले वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरूणाच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच भीमा कोरेगाव परिसरात आणि राज्यभरात आंबेडकरी अनुयायांनी शांतता बाळगावी असेही आवाहन केले आहे. मात्र काही वेळापूर्वीच भीमा कोरेगावमध्ये झालेल्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी होईल असेही त्यांनी सांगितले आहे. याच हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. तसेच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आंबेडकरी अनुयायांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही आठवले यांनी ‘एएनआय’कडे स्पष्ट केले. अनेक आंबेडकरी अनुयायांनी मुंबई, ठाणे, पिंपरी, औरंगाबाद, परभणी यासह काही ठिकाणी भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. मात्र सोमवारी झालेल्या हिंसाचारात तरूणाचा मृत्यू झाला. या मृत्यूची आता सीआयडी चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या तपासातून काय बाहेर येईल ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.