राष्ट्रपतींनी सांगितले तरच राज्यपाल पद सोडण्याचा विचार करेन, असे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बुधवारी स्पष्ट केले. राजभवनातील सूत्रांनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत माहिती दिली.
कॉंग्रेस सरकारच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांवर मोदी सरकारची वक्रदृष्टी पडली असून, या सर्वांना पद सोडण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशी यांनी मंगळवारी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. गृह मंत्रालयाने शंकरनारायणन यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी शंकरनारायणन यांना फोन केला होता आणि त्यांना पद सोडण्यास सांगितले होते. लोकशाहीमध्ये कोणतेही पद कायमस्वरुपी नसते. त्यामुळे सुयोग्य व्यक्तीने पद सोडण्याची सूचना केली तर त्याचा नक्की विचार करेन, असे शंकरनारायणन यांनी म्हटल्याचे राजभवनातील सूत्रांनी सांगितले.
शंकरनारायणन हे २२ जानेवारी २०१० पासून राज्याचे राज्यपाल आहेत. राष्ट्रपतींनी त्यांचा कालावधी ७ मे २०१२ रोजी पाच वर्षांनी वाढविला होता.