मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आधीच्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील विविध पाटबंधारे विकास महामंडळांवरील राजकीय नियुकत्या रद्द केल्या आहेत. त्यात कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे खा. संजयकाका पाटील यांचा समावेश आहे.

सरकार बदलले की आधीच्या सरकारने केलेल्या राजकीय नियुक्त्या रद्द करण्याची परंपराच आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारने आधीच्या सरकारच्या काळातील विविध महामंडळे, शासकीय समित्यांवरील राजकीय नियुक्त्या रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. यापूर्वी सिडको महामंडळाचे अध्यक्ष व भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली आहे.

राज्यात विभागवार पाच पाटबंधारे विकास महामंडळे आहे. त्यावर उपाध्यक्ष म्हणून राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाते. भाजप-शिवसेना सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी या महामंडळांवर उपाध्यक्षपदी राजकीय नियुक्त्या केल्या होत्या. त्या आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत आंबरे, गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे व भास्कर आंबेकर, तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणराव पाटील आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटील यांच्या नियुक्त्या रद्द झाल्या आहेत. राज्य शासनाने शुक्रवारी तसा आदेश काढला आहे.