विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपच्या राजन तेलींची माघार

मुंबई : संख्याबळाचे गणित जमत नसल्याने अखेर भाजपचे राजन तेली यांनी माघार घेतल्याने महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दौंड यांना उमेदवारी दिली होती, त्यांना काँग्रेस व शिवसेनेने पाठिंबा दिला होता. दौंड यांच्या निवडीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्य़ातील राजकीय महत्त्व वाढल्याचे मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली.

विधानसभेच्या सदस्यांकडून ही जागा निवडून द्यायची होती. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी या नावाने सरकार स्थापन केले आहे. विधान परिषद निवडणुकीतही महाआघाडी अभेद्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मूळचे काँग्रेसचे असले तरी राष्ट्रवादीच्या कोटय़ातील ही जागा असल्याने परळीतीलच संजय दौंड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. भाजपचे उमेदवार म्हणून राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

धनंजय मुंडेचा आग्रह..

विधानसभेतील सदस्यांचे संख्याबळ पाहता, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी व त्यांना पाठिंबा असलेल्या अपक्षांची संख्या १६९ आहे. तर भाजपचे संख्याबळ १०५ आहे. संख्याबळाचे गणित जमत नसल्याने अखेर तेली यांनी माघार घेतली व दौंड यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. स्थानिक राजकीय गणिते जमविण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या आग्रहाखातर दौंड यांना उमेदवारी दिल्याचे समजते. त्यांच्या विजयामुळे मुंडे यांचे बीड जिल्ह्य़ातील राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे.