शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची पक्षविस्ताराची रणनीती

सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई

विधानसभा निवडणुकीत विदर्भात २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपची थोडी पिछेहाट झाली. अनेक जागांवर भाजपचे आमदार थोडक्या मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात पक्षविस्ताराची संधी शिवसेना-कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर चालून आली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घेत भाजपची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘मिशन विदर्भ’ हाती घेतले असून, पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्पासह विदर्भासाठीच्या अनेक घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केल्या आहेत.

विदर्भातील अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते व इतर काही कारणांमुळे थोडक्या मतांनी पराभूत झाले. त्यामुळेच विदर्भाकडे थोडे लक्ष दिले तर आणखी काही जागा निवडून आल्या असत्या असे विधान राष्ट्रवादी काँॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी निकालानंतर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाचा दौरा केला. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनावेळी पुन्हा शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आले.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आता ‘मिशन विदर्भ’ हाती घेतले आहे. त्यातूनच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडीने विदर्भातील रखडलेले प्रकल्प, समस्या यांवर चर्चा उपस्थित केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारला कोंडीत पकडण्यासाठीच ती रणनीती होती. त्या वेळी अधिवेशनाच्या समारोपावेळी चर्चेला उत्तर देताना, ‘तुम्ही काम केले नाही असे म्हणत नाही, पण देवेंद्र फडणवीस आपल्या काळात विदर्भाचा विकास झालेला नाही. विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. विदर्भाच्या विकासात कुचराई करणार नाही’, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

विदर्भासाठी घोषणा..

विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरू असून, गोसीखुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार, विदर्भासाठी महत्त्वाचा असलेला समृद्धी महामार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पैसे देईल व त्यातून व्याजापोटी अडीच हजार कोटी रुपये वाचवणार, समृद्धी महामार्गाभोवती कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करून ५ लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. विदर्भात आदिवासी लोकसंख्या लक्षणीय असल्याने आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक  अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार, लोणार सरोवराचा परिसर जतन करण्यासाठी तो नैसर्गिकरित्या सुशोभित करणार, विदर्भात पर्यटनाच्या सोयीसुविधा वाढवणार, विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार, असे ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या सर्व घोषणा म्हणजे महाविकास आघाडीने विदर्भाकडे लक्ष देऊन भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.