महाडनजीक सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून त्यात अनेकजण वाहून गेल्यानंतर अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ३६ तास उलटून गेल्यानंतरही तपास यंत्रणांना बेपत्ता प्रवाशांचा आणि वाहून गेलेल्या गाड्यांचा शोध लावण्यात यश आलेले नाही. या दुर्घटनेतील मदतकार्याबाबत सरकारी यंत्रणांची संथ गतीही धक्कादायक आहे. त्यामुळे काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या असून त्यांच्यातर्फे प्रवासी आणि दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. तसे संदेश व्हॉट्सअॅपवर फिरण्यास सुरूवात झाली आहे.
या दुर्घटनेत ज्यांचा दुदैवी अंत झाला आहे त्यांचा शोध घेण्यासाठी कोकण व मुंबई परिसरातून येणाऱ्या नातेवाईकांसाठी अंजुमन दर्दमंदाने तालीम तरक्की ट्रस्टच्या इसाने कांबळे येथील कालसेकर हायस्कुल येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. १९९८ सालची या ट्रस्टची नोंदणी असून संस्थेतर्फे या परिसरात विविध समाजिक कार्ये केली जातात. संस्थेतर्फे लोकांना मोफत पाणी आणि सकाळी छोट्या कंटेनरमधून नास्त्याचे वाटप करण्यात आले. आता दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती पुरकर यांनी दिली. लोकांच्या निवासाचीही व्यवस्था घटनास्थळापासून पाच मिनिटांच्या अंतरावर करण्यात आलेली आहे. तरी नातलगांच्या शोधासाठी येणाऱ्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मुफ्ती रफिक पुरकर – ८५५१००४८४८
मुफ्ती मुझफ्फर सैन – ८६९८३०६१६१
मौलाना रज्जाब अली बरमारे – ९४२२४९५९६४
मौलाना इशाक घारे – ९०२८५६२७९१
मुफ्ती खालिद झतम – ९४२२०७६३०७